नोव्हेंबरपासून घरपट्टी भरता येणार ऑनलाईन

0
17

>> पंचायत खाते सेवा करणार उपलब्ध

राज्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी, व्यापार परवाना आदी काही सेवा येत्या नोव्हेंबर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी काल दिली.

पंचायतीच्या सेवा ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पंचायत क्षेत्रातील अनेक जण विविध कारणास्तव पंचायतीमध्ये घरपट्टी भरण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे घरपट्टीची वेळेवर वसुली होत नाही. त्यामुळे घरपट्टी भरण्याची सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. व्यापार परवाना घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा दिली जाणार आहे. पाणी, वीज जोडणीसाठी ना हरकत दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पंचायत संचालनालयाच्या संकेतस्थळावरून ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच, ऑनलाईन सेवेच्या दुसऱ्या टप्प्यात बांधकाम परवाना, वहिवाट प्रमाणपत्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.