- रमेश सावईकर
शिक्षण घेतल्याने आपण शिक्षित होतो; पण सुशिक्षित होण्यासाठी त्या शिक्षणाला सगुणांची नि सुसंस्कारांची गरज असते. त्यानुसार जीवनमूल्यांच्या आधारावर शिक्षण संपादन केले तरच आपण सुशिक्षित झालो असे म्हणता येईल.
मनुष्य जन्म ही परमेश्वराकडून माणसाला लाभलेली अनमोल देणगी आहे! सर्व प्राणिमात्रांच्या तुलनेत माणसाचा जन्म लाभणे म्हणजे भगवंताची विशेष कृपा! माणसाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. जीवन हे अनमोल आहे, सुंदर आहे म्हणून या जगण्यावर, या जन्मावर माणसाने शतदः प्रेम केले पाहिजे. आपला जन्म कशासाठी आहे, या जन्मात आपणाला काय करायचे आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. माणसाने जीवनाची मूल्ये जपावीत, त्या मूल्यांवर आधारित सत्कर्म करीत जीवन जगावे. सर्वांशी नेहमी मंगल बोलावे.
माणसाचे जीवन हे मूल्याधिष्ठित असावे. जीवनाची मूल्ये नुसती समजून भागणार नाही, त्या मूल्यांनुसार जीवनात आचरण व्हायला हवे. जीवनमूल्ये ही संस्कारांतून माणसाच्या अंगी भिनवावी लागतात. हे सर्वात मोठे कर्तव्यतत्पर कार्य मूल लहान असताना आई-वडील करीत असतात. बोबडे बोल संपून मूल मोठे होते त्यावेळी त्याचे मन ‘कोऱ्या पाटी’सारखे असते. त्या पाटीवर ओरखडे ओढले जाणार नाहीत याची काळजी आई-वडिलांनी घ्यायची असते. संस्कार करण्याचे वयही ठरलेले असते. एक ते दहा वर्षांपर्यंत मुलावर चांगले संस्कार होणे अत्यंत गरजेचे असते. त्या काळाला संस्कारक्षम वय म्हणतात. मूल मस्ती करू लागले, खोड्या करू लागले, हट्ट करू लागले की आई त्याची समजूत काढते. मूल पाच वर्षांचे झाल्यानंतर शाळेत जाऊ लागले की आई त्याला घरी आपले धडे शिकवत असते. खरे बोलायचे, खोटे बोलायचे नाही, आपल्या शेजारील मुलांबरोबर चांगले वागायचे. त्यांच्याशी मैत्री करायची. भांडण करायचे नाही. हे संस्कार आई आपल्या मुलावर किती प्रभावीपणे करते किंवा करू शकते यावर त्या मुलाची पुढील संस्कारित वाटचाल अवलंबून असते.
घरात मुलाकडून काही चूक झाली तर पुन्हा अशी चूक करायची नाही असे लडिवाळपणे त्याला आई सांगते. मस्ती केलेली मला चालणार नाही. एकदा चूक केली तशी पुन्हा करशील तर मी गप्प बसणार नाही, असे वडील मुलाला सांगतात. त्या सांगण्यामध्ये धाक असतो. तो धाक असला तरच मुलाच्या मनात आपण चूक केली तर शिक्षा भोगावी लागेल अशी भीती निर्माण होते. ती भीती ही आदरयुक्त असते. म्हणून वडिलांकडून होणारे संस्कारही तितकेच महत्त्वाचे असतात. मुलगा शाळेत जाऊ लागला की त्याच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकाची असते. पूर्वी मुलगा आठ वर्षांचा झाला की त्याचे व्रतबंध संस्कार केले जायचे. व्रतबंध संस्कार झाले की त्याची रवानगी गुरूकडे. गुरुकुल पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जायचे. गुरूकडून विद्या शिकण्याचे व्रत स्वीकारले जायचे म्हणून त्या संस्काराला ‘व्रतबंध’ संस्कार म्हटले जायचे. आता ‘व्रतबंध’ऐवजी ‘उपनयन संस्कार’ असे त्या विधीला म्हटले जाते. गुरूची भेट होणे आणि त्याच्याकडून विद्येचे धडे शिकणे यातून मुले नुसती शिक्षित नव्हे तर ज्ञानवंत व्हायची.
कालांतराने आता गुरुकुल पद्धती जाऊन शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झाल्या. शाळांतून शिक्षक विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमानुसार शिकवतो. ते शिक्षण देताना अवांतर ज्ञानाबाबत विचार होत नाही. मुले ही देशाची उत्तम भावी पिढी बनण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे, अशी विधाने शिक्षणतज्ज्ञच करतात. तमाम राजकीय नेत्यांच्या तोंडूनही ही गरज बरळली जाते.
मूल्यांची गरज ही फक्त शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात त्यांचे महत्त्व आहे. जीवनात आपण मूल्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी. प्रत्येक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीने सातत्याने शिकत राहायला हवे, मग ते कोणाकडूनही असो. अशिक्षित असो, ग्रामीणजन असो किंवा विद्या-कलेत पारंगत असणारा कोणी असो- त्याच्याशी संबंध आल्यावर जे अनुभव येतात त्या अनुभवांतून आपण शिकले पाहिजे. आणि आपण जे शिकतो ते दुसऱ्याला शिकवायला हवे.
शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिकविणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच शिकणेही महत्त्वाचे असते. शिकविणारा जो असतो तो सर्वगुणसंपन्न, पूर्ण शिक्षित असू शकत नाही. शिकविणाऱ्यानेही जीवनभर नवनवीन शिकत राहावे, शिकणाऱ्याकडूनही शिकावे. ज्ञानाचा सागर अथांग आहे. आपली पूर्ण हयात गेली तरी त्याचा ‘थांग’ लागणे कठीण!
शिक्षण घेतल्याने आपण शिक्षित होतो; पण सुशिक्षित होण्यासाठी त्या शिक्षणाला सगुणांची नि सुसंस्कारांची गरज असते. त्यानुसार जीवनमूल्यांच्या आधारावर शिक्षण संपादन केले तर आपण सुशिक्षित झालो असे म्हणता येईल. कोणत्याही एका क्षेत्राची आपणाला माहिती असणे म्हणजे त्या क्षेत्राचे आपणाला ज्ञान आहे असे होत नाही. त्या क्षेत्राचे शिक्षण, अभ्यास नि एकनिष्ठपणे त्याचे ज्ञान संपादन करण्याची तयारी असावी लागते. ती पूर्णपणे निभावून नेली की मग त्या क्षेत्रात आपण सज्ञानी झालो असे म्हणू शकतो.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी कॉलेजविश्वात प्रवेश करतो. या काळात विद्यार्थी ज्ञानी झालेला असतो. आपणाला सगळं कळतं असा त्याचा समज असतो. त्याला स्वातंत्र्य हवे असते. त्याचे मन फुलपाखरासारखे बनलेले असते… या फुलावरून त्या फुलावर भुर्रकन उडून जाणारे. विद्यार्थ्याच्या या फुलपाखरी जीवनाला सांभाळणे कठीण असते. त्यावेळी आपल्या मुलाच्या मनात नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्याची पालकांची तयारी हवी, सक्षमता हवी. आपली मुले ही मित्र-मैत्रिणीवत आहेत असे समजूनच पालकांनी चालणे गरजेचे असते.
त्याच्या मनातील स्वप्नांना पूर्ण विरोध केला तर त्याचा विपरित परिणाम होतो. ती म्हणतात की, ‘मला माझी स्पेस हवी.’ याचाच अर्थ त्यांचे विचार, त्यांच्या आकांक्षा नि स्वप्ने काय आहेत ही पालकांनी जाणून घ्यायला हवीत. या काळात मुलावर सुरुवातीपासूनच मूल्याधिष्ठित संस्कार झालेले असतील तर ती मुले विचारपूर्वक जीवनासंबंधीचा निर्णय घेतील. जीवनाची महत्त्वाची मूल्ये म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, विनम्रपणा, सलोखा, शांती, एकता आणि सात्त्विक गुणवत्ता. ही मूल्ये जपणारी, जतन करणारी, त्यांचे आचरण करून जीवन व्यतीत करणारी माणसे आजकाल दुर्मीळ होत चालली आहेत. दिखाऊपणाचे बेगडी मुखवटे धारण करून उजळ माथ्याने फिरणारेच अधिक आढळतात.
मूल्यांचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्राला ती लागू पडतात. बडेजावकी थाटात, सत्तेच्या कैफात वावरणारे राजकीय नेते मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व विशद करणारी भाषणे ठोकतात, त्यांनी मूल्यांची कदर नको का करायला? ते मतदारांची सेवा करणे हे आपले व्रत मानतात, त्यांना विविध गोष्टी उपलब्ध करून देण्याची आश्वासने देतात; नि एकदा का सत्तेच्या गादीवर बसले की सगळे मूसळ केरात. जनतेला लुबाडून अधिकाधिक माया कशी जमवायची हाच त्यांचा उद्योग असतो.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणून जीवनभरची हयात घालविणारे व्रतस्थ डॉक्टर आजच्या जमानात आहेत का? लोकांचे आरोग्य बिघडत राहिले तर आपला व्यवसाय उत्तम तऱ्हेने चालेल म्हणून डॉक्टरी ज्ञान खुंटीला टांगून ठेवणारे महाभागही कमी नाहीत. माणसाच्या (रुग्णाच्या) अवयवांची विक्री करणारी ‘रॅकेट्स’ होणे इतपर्यंत वैद्यकीय क्षेत्रात अधोगती व्हावी याला काय म्हणावे?
व्यापाराबाबत तर काही विचारूच नका. अन्नात भेसळ करून दामदुप्पट पैसा कसा प्राप्त होईल हेच मुख्य ध्येय मानणारे व्यापारी केव्हा श्रीमंत होतात कळतच नाही. भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने माणसांना आजार बळावतात. दूषित हवा, पाणी, अन्नामुळे सांसर्गिक रोग फैलावतात नि डॉक्टरांचे फावते. सामान्य माणूस मात्र परिस्थितीच्या जात्यात भरडला जात आहे.
आज परिस्थिती बदलत चालली आहे. जीवनमूल्यांचा ठायी ठायी ऱ्हास होताना दिसत आहे. सत्याची जागा असत्याने घेतली आहे. प्रामाणिकपणा संपला आहे. एकमेकांवरचा विश्वास तर केव्हाच उडाला आहे. विनम्रता-विनयशीलता दुर्मीळच. वैरत्व, शत्रुत्व, हेवे-दावे, घमेंड, गुर्मी, दुष्टपणा, विध्वंसक प्रवृत्ती आदी बाबी फक्त वाढतच नसून त्या पराकोटीला गेल्या आहेत. सगुण-सात्त्विक स्वभावप्रकृतिधर्माची माणसे आज भेटत नाहीत. रज-तम गुणांचा अतिरेक होऊन तामसी प्रवृत्ती वाढली आहे. माणूस माणसाच्या जीवावर उठला आहे आणि अशा या परिस्थितीच्या फेऱ्यात सात्त्विक प्रकृतिधर्माच्या माणसांचे जीवन धोक्यात येण्याची भीती वाटतेय. ज्या महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, शांतीचा संदेश दिला, शांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या महात्मा गांधींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या आणि ‘हे राम’ हे शेवटचे शब्द उच्चारून जगाचा निरोप घ्यावा लागला.
जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आलेल्या येशू ख्रिस्ताला लोकांनी ‘क्रॉस’वर चढवून खिळे ठोकले. त्यावेळी ख्रिस्त उद्गारला होता, ‘हे प्रभो, त्यांना क्षमा कर, ते काय करीत आहेत हे त्यांनाच माहीत नाही.’ ज्या वि. दा. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनंत हालअपेष्टा नि अनन्वीत छळ सोसून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांच्या पदरी देश स्वातंत्र्य झाल्यावर तरी काय आले? महात्मा गांधी खून खटल्यात त्यांना आरोपी म्हणून गुंतविण्यात आले. ज्या वि. दा. सावरकरांवर अंदमानहून सुटका होऊन मायदेशी आल्यावर अभिनंदनाचा नि पुष्पवृष्टीचा वर्षाव झाला, तेच लोक संशयित आरोपी म्हणून सावरकरांना न्यायालयात नेताना गुन्हेगार समजून तिरस्कारी भावनेने पाहत होते. ज्युरीने सावरकरांना ‘तुम्हाला काही सांगायचे आहे का?’ असे विचारल्यावर सावरकर उद्गारले होते, ‘ज्या दिवशी गांधी खून खटल्यात संशयित आरोपी म्हणून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले त्याचवेळी वि. दा. सावरकर संपला.’ शेवटी सावरकरांची निर्दोष सुटका झाली.
जीवनमूल्ये जतन करण्याचे व्रत घेणाऱ्या माणसाच्या वाट्याला शेवटी काय येते? असा प्रश्न पडतो. पण यातून वस्तुपाठ हा घ्यायचा की त्या व्रतस्थ माणसांना कस्पटासमान लेखून त्यांना मारणारे कायमचे संपले आणि त्यांनी ज्यांना मारले ते ‘अमर’ हुतात्मे झाले.
आज जगातील वेगवेगळ्या देशांत ज्या घटना घडत आहेत, हिंसाचार- भ्रष्टाचार- दंगली- जातीय तंटे- शत्रुराष्ट्रांमध्ये युद्धे आदी प्रकार पाहता महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा नि शांती या तत्त्वांची जगाला आजही गरज आहे हे आवर्जून जाणवते. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा परमेश्वराकडे विश्वशांतीसाठी पसायदान मागितले आहे.
जीवनमूल्यांचे मोल कधीही कमी होणार नाही. त्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचे माणसाने ठरवले पाहिजे. त्याकरिता तशी माणसे घडविण्याचे काम शिक्षक, गुरू नि सद्गुरूंनी केले पाहिजे. शिक्षकांची, गुरूची इच्छाही चांगली माणसे घडावीत अशी असते. पण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पोचल्यावर त्यांना मार्गदर्शन करून पुढे नेणे हे आजच्या परिस्थितीत एक आव्हान आहे. माणसे घडविणे हे सत्कार्य महत्प्रयासाचे आहे. तसे माणसे घडणेदेखील सोपे काम नव्हे. अशी परिस्थिती असली तरी चांगली माणसे, चांगला समाज घडविण्याचे महान कार्य जमेल तसे करीत राहावे. सत्कार्य केल्याने अखेर आपले जीवन सार्थकी लागल्याचे आत्मिक समाधान नि आनंद लाभेल.
ज्यांना जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने काय आहे हे कळले आहे, समजले आहे त्यांनी दुसऱ्याचे जीवन सन्मार्गी लावून अखेर ते सार्थकी लागेल यासाठी जरूर प्रयत्नरत व्हावे. जीवन हा एक धर्म आहे. मग त्याला मानवता म्हणा किंवा माणुसकी- मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा (भक्ती) आहे, हे आपल्या जीवनाचे ब्रीद असायला हवे. काळ उलटून पुढे जात असतो तशी या मानवधर्माला ग्लानी येणेही शक्य आहे. त्यावेळी या धर्माची पुनर्रस्थापना करण्यासाठी मी पुनश्च अवतार घेईन असे भगवान श्रीकृष्णानेच म्हटले आहे- ‘संभवामी युगे युगे।’ त्या भगवंताला जो धर्म अभिप्रेत आहे त्या धर्माचा प्रचार-प्रसार व्हावा, तो धर्म वाढत जावा म्हणून जीवनात कार्यरत राहाणे म्हणजे त्या श्रीकृष्णाची खऱ्या अर्थाने भक्ती करणे होय.