पराजय

0
20
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

पांडव पाच असून त्यांची निष्ठा एक होती. वडीलभाऊच्या निर्णयाला सगळे चिकटून राहायचे. आपापसातील मतभेद बाजूला सारून युधिष्ठिराचा निर्णय सर्वसंमत म्हणून स्वीकारायचे. विश्वासघाताला थारा नव्हता हाच सर्वात मोठा बोध आजच्या युगातील बंंधूंनी घ्यायला हवा.

आज विजय मिळणे कठीण; पण पराजय मिळणे अगदीच सोपे! पराजयाचा आराखडा आपल्या हितशत्रूंनी आखलेला असतो. कारस्थानांच्या सापळ्यात अडकल्यावर पराजय स्वीकारल्याशिवाय सुटका नाही.
पांडवांनी प्रत्येक पाऊल घालताना पराजयच स्वीकारला. शकुनीमामाची सगळी कारस्थाने त्यांना कळत होती. लाक्षागृहात प्रवेश घेताना विदुराने उंदिराचे उदाहरण देऊन ‘बिळातून बाहेर पडावे’ ही सूचना उपरोधाने दिली होती. फांसे टाकून जुगार खेळताना शकुनीच जिंकेल हेही स्पष्टपणे दिसत होते. बारा वर्षे वनवास आणि तेरावे वर्ष अज्ञातवास हा धृतराष्ट्राच्या मनात पांडवांसाठीच अपेक्षित आहे, हेही युधिष्ठिराला कळत होते. द्रौपदीला डावावर लावताना हारल्यास तिचा छळ होईल हेही धर्मराजाला समजत होते. पण शकुनी आणि दुर्योधन कोणत्या निम्न स्तरापर्यंत पोचू शकतात हे जगाला कळायचे होते. सगळे पांडव दुर्योधनाचे दास अथवा गुलाम होऊन बसले असता श्रीकृष्णाने जर द्रौपदीला वस्त्रे पुरवली नसती तर वस्त्रहरणाच्या प्रसंगी भारतीय इतिहासातील सर्वघात झाला असता.

नारीची विटंबना भगवंतानी रोखली व स्त्रीजातीवर महान उपकार केले. येथे पांडव द्युतात हरले पण लोकमानसांमध्ये कौरवांचाच पराजय झाला. तत्कालीन संपूर्ण जनतेने कौरवांचा धिक्कार केला. पांडवांची प्रतिमा जनमानसामध्ये उजळत निघाली. कौरवांच्या विजयाचा कोणीच जयघोष केला नाही; पण पांडवांच्या पराजयाने लोकांना वाईट वाटले.

कांचनमृग सीतेने रामाला दाखवला आणि त्याच्या सोनेरी कातड्याची चोळी आपल्याला हवी अशी अपेक्षा केली. रामाला काय कळत नव्हते की सोन्याचा मृग असूच शकत नाही; आणि दिसतो तो नुसता फसवा मायावी भास आहे. तरीदेखील सीतेच्या समाधानासाठी राम कांचनमृगाच्या (मारीच राक्षसाच्या) मागे धनुष्यबाण घेऊन धावला.
जे भोगायचे आहे ते चुकत नाही. आपल्याला बारा वर्षांच्या वनवासात सगळे भोग भोगायला हवेत व तेरावे अज्ञातवर्षाचेही वर्ष तेवढ्याच जिद्दीने भोगायला हवे. पराजयातदेखील युधिष्ठिर आपला धर्म सोडणार नाही याची शकुनी या शत्रूलादेखील पक्की खात्री होती. यामुळे युधिष्ठिराची कीर्ती शंभर पटीनी प्रज्वलित होते. चारही पांडवबंधू व पत्नी द्रौपदी सोबतीला नाही राहिली तरी एकट्यानेच एकूण तेरा वर्षांचे वनवासातील कष्ट सहन करण्यास धर्मराज सिद्ध झाला होता, यावरून त्याच्या धैर्याची व धर्मनिष्ठेची कल्पना येते. येथे पराजय विजयापेक्षाही प्रभावित होऊन चमकतो हे सांगायला नको.

विजय व पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी पराजय हसत-हसत स्वीकारावा लागतो. प्रत्येक वेळी फासे शकुनीच्या बाजूने दान देत असताना युधिष्ठिर निराशेने कोसळला का? बिलकुल नाही! संपूर्ण पराजयाला आलिंगन द्यायला तो तयारच होता. आपल्याला काय भोगावे लागेल याची त्याला पूर्वकल्पना होती. एकच प्रशंसेची व कौतुकाची गोष्ट म्हणजे पांडव पाच असून त्यांची निष्ठा एक होती. वडीलभाऊच्या निर्णयाला सगळे चिकटून राहायचे. आपापसातील मतभेद बाजूला सारून युधिष्ठिराचा निर्णय सर्वसंमत म्हणून स्वीकारायचे. विश्वासघाताला थारा नव्हता हाच सर्वात मोठा बोध आजच्या युगातील बंंधूंनी घ्यायला हवा. आज पाच सोडाच, दोन बंधूदेखील एकनिष्ठ होत नाहीत ही सर्वात मोठी खंत करण्यासारखी शोकांतिका आहे.
पराजित युधिष्ठिराचे गुण किती बरे वर्णावे? गंधर्वकन्येचा विनयभंग केल्यावर जंगलामध्ये दुर्योधनाला गंधर्वांनी बंदिस्त बनवले. देहदंडाची शिक्षा सुनावली. कोठून तरी वार्ता युधिष्ठिराच्या कानी पडल्यावर ‘आम्ही आपापसात भांडतो ते आमचे घरातील भांडण आहे, पण परकीयांशी भांडताना आम्ही एकशे पाच आहोत’ असा युक्तिवाद मांडत भीम आणि अर्जुनाला दुर्योधनाच्या सुटकेसाठी युधिष्ठिराने पाठवले व त्याला मृत्यूच्या दारातून सोडवून आणले. यावरून युधिष्ठिराच्या मनाचा मोठेपणा, दिलदारपणा व समंजसपणा लक्षात येतो. दुर्योधन विजयी व युधिष्ठिर पराजयी असूनदेखील दुर्योधनाला मनातून खजिल व्हावे लागले. सुंभ जळले पण पीळ गेला नाही. दुर्योधनाची दुष्ट बुद्धी जरादेखील कमी झाली नाही. येथे विजय श्रेष्ठ की पराजय श्रेष्ठ या दोहोंपेक्षा पवित्र मनोवृत्ती श्रेष्ठ हेच उत्तर द्यावे लागेल.

पराजयाच्या भोवऱ्यात सापडल्यावर सुटका नाही. असत्य हे शंभर धाग्यांनी विणलेले असते व सत्याचा धागा एकच असतो. तो अदृश्यच असतो. असत्य कितीही जरी उचंबळत राहिले तरी अंतिम विजय हा सत्याचाच असतो.
श्रीकृष्णाला महाभारताच्या युद्धात हेच दाखवायचे होते. युद्धाने सर्वनाश होईल म्हणून युद्ध श्रीकृष्णाला टाळायचे होते. ‘पांडवांना पाच गाव द्या, ते सुखाने राहतील. हेही न जमल्यास एक गाव तरी द्या. कायद्याचे अर्धे राज्य नकोच’ एवढी विनंती पांडवांतर्फे श्रीकृष्णाने महाराज धृतराष्ट्राला केली. पण दुर्योधनाने गांधारी व धृतराष्ट्र या माता-पित्याचा प्रचंड अपमान करतच ती धुडकावून लावली व उर्मटपणे म्हणाला, ‘सुईच्या टोकावर मावेल एवढीदेखील जमीन मांडवांना मिळणार नाही!’ वाटाघाटी करायला आलेल्या श्रीकृष्णाला बंदिवान बनवून कैदेत टाकण्याचे कारस्थानदेखील त्याने रचले; पण श्रीकृष्णाला दुर्योधनाच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे आपल्या सैन्यासह युद्धाच्या संपूर्ण तयारीनेच श्रीकृष्ण तेथे गेला होता.
युद्ध थांबवण्याचे श्रीकृष्णाचे सगळे प्रयत्न निष्फळ झाल्यावर शेवटी युद्ध झालेच. आयुष्यभर पांडव पराजयाच्या होमकुंडातून चालत शेवटी अखेर विजयी झाले.