यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार काल जाहीर करण्यात आला. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांती पुरस्कार जाहीर केला. मोहम्मदी यांनी इराणमध्ये महिलांची स्थिती सुधारण्यासाठी संघर्ष केला होता. तसेच मानवी हक्क आणि लोकांचे स्वातंत्र्य यासाठी त्यांनी दीर्घकाळापासून लढा लढला आहे, त्या कार्याचा सन्मान नोबेल पुरस्काराने करण्यात आला आहे; परंतु हा पुरस्कार स्वीकारायला त्या ओस्लोला (नॉर्वेची राजधानी) जाऊ शकणार नाहीत. कारण सध्या त्या तुरुंगात आहेत.
नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील, समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करत शांततेची शिकवण जगाला देतात.
शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार
यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते, त्यापैकी 259 व्यक्ती आणि 92 संस्था होत्या. सलग आठ वर्षांपासून उमेदवारांची संख्या 300 च्या वर गेली आहे.
कोण आहेत नर्गिस मोहम्मदी?
51 वर्षीय नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. नर्गिस यांना त्यांचे लेखन आणि सरकाविरोधातील आंदोलने यामुळे अनेकदा शिक्षा झाली आहे. न्यायव्यवस्थेने मोहम्मदी यांना पाच वेळा दोषी ठरवले आहे आणि 13 वेळा अटक केली आहे. या सर्वांचा एकत्रित विचार केला असता त्यांना 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.