पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे 26 रोजी उद्घाटन

0
7

>> फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर शुभारंभाचा सोहळा; 43 क्रीडा प्रकारांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ होणार आहे. 12 हजार क्षमतेच्या नेहरू स्टेडियममध्ये संध्याकाळी 6.30 वाजता हा सोहळा होणार आहे. शुभारंभ सोहळा 26 रोजी होणार असला तरी ह्या क्रीडा स्पर्धांतील दोन क्रीडा प्रकारांचे आयोजन 26 ऑक्टोबरपूर्वी होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरीतील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा सचिव आणि वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या क्रीडा स्पर्धांच्या 6 दिवसांपूर्वीच सर्व स्पर्धा स्थळे सुसज्ज असतील, असे स्पष्ट केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 43 क्रीडा प्रकारात स्पर्धा होणार असून, त्यापैकी 36 क्रीडा प्रकारात गोव्यातील क्रीडापटू भाग घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. या क्रीडा स्पर्धेत देशभरातील 10860 क्रीडापटू भाग घेणार आहेत. त्यापैकी सुमारे 5320 क्रीडापटू (49 टक्के) ह्या महिला असतील. ह्या स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत होणार आहेत. यंदाच्या क्रीडा स्पर्धेत 43 प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा समावेश केलेला असून, एवढे क्रीडा प्रकार यापूर्वीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत कधीही समाविष्ट नव्हते. हा एक जागतिक विक्रम ठरणार आहे. पणजी, म्हापसा, वास्को, फोंडा, मडगाव व कोलवा समुद्रकिनारा येथील एकूण 28 स्थळांवर ह्या स्पर्धा होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ह्या स्पर्धा योग्यरित्या संपन्न व्हाव्यात यासाठी 4740 तांत्रिक अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. स्पर्धेत 5 प्रकारच्या जलक्रीडा होणार आहेत. त्याशिवाय 8 स्थानिक क्रीडा प्रकारांनाही स्थान देण्यात आलेले असून, त्यात ‘लगोरी’ ह्या क्रीडा प्रकाराचाही समावेश आहे. दरम्यान, गोमंतकीय क्रीडापटू 43 क्रीडा प्रकारांपैकी 36 क्रीडा प्रकारात होणाऱ्या स्पर्धांत भाग घेऊन आपली चुणूक दाखवणार आहेत.

नव्या खेळांचा समावेश
विशेष म्हणजे, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बीच फुटबॉल, रोल बॉल, गोल्फ, स्काय मार्शल आर्ट्स, कल्ल्यारापट्टू आणि पेनकॅक सिलाट आदी खेळांचा राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण होणार आहे. याव्यतिरिक्त, नौकानयन आणि तायक्वांदो मागील आवृत्तीत वगळल्यानंतर पुनरागमन करत आहेत. याशिवाय लगोरी आणि गतका या खेळांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे.