अनिल होबळे यांची स्नुषा श्वेता होबळे यांच्या छळ प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी पणजीतील महिला पोलीस स्थानकाला नोटीस बजावली असून १८ जुलै रोजी उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी होबळे यांची स्नुषा श्वेता यांच्या मातोश्री सुचित्रा शिरोडकर यांनी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्याच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तिने दाखल केलेल्या याचिकेत आपल्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी आपण येथील महिला पोलीस स्थानकात जी तक्रार नोंदवली आहे त्याप्रकरणी महिला पोलीस व्यवस्थितपणे तपासकाम करतात की नाही याकडे न्यायालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. होबळे हे एका राजकीय पक्षाचे उपाध्यक्ष असून ते राजकीयदृष्ट्या एक वजनदार असे व्यक्ती आहेत. त्यामुळे आपण केलेल्या तक्रारी संदर्भात व्यवस्थितपणे तपासकाम होईल की नाही याबाबत शंका असल्याचे तिने याचिकेतून न्यायालयाच्या नजरेत आणून दिले आहे. महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक संध्या गुप्ता या ह्या प्रकरणी व्यवस्थितपणे तपासकाम करीत नसल्याचा आरोपही तिने याचिकेतून केला आहे.