>> भीषण आगीमुळे सात दुकानांची हानी
>> आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज
डिचोली बाजारमध्ये गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कापड दुकान, मसाले दुकान, भांड्यांचे दुकान तसेच इतर एकूण सात दुकाने जळाल्याने रात्रीच्या वेळी एकच खळबळ माजली असून या घटनेत एकूण सव्वा कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्रथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या आगीत काही दुकाने पूर्णपणे बेचिराख झाल्याने मोठे नुकसान झाले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. कापड तसेच दुकानाच्या छप्पराला आग लागल्याने ती विझवणे कठीण झाले. यावेळी फोंडा, वाळपई, म्हापसा, पणजी येथील अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. स्थानिक लोकांनी खूप धावपळ करून मोठे सहकार्य करताना सामान आगीपासून वाचववण्यासाठी खूप परिश्रम घेतले. यावेळी स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, नगराध्यक्ष कुंदन फळारी, सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे स्थानिक युवकांनी मोठे सहकार्य दिले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र जळालेली दुकाने पाहून लोक हेलावले. या आगीत अंदाजे सव्वा कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आमदार डॉ. शेट्ये यांनी ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारदरबारी मुख्यमंत्री मदतनिधी तसेच आपत्कालीन यंत्रणा निधीतून जमेल ती अधिकाधिक मदत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल नाईक यांनी पाच गाड्या या ठिकाणी आणून ही आग आटोक्यात आणण्यात यश आल्याचे सांगताना नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येत असून सुमारे एक कोटीच्या आसपास नुकसान झाले असल्याचे संगितले.
ही आग रात्री लागली त्यावेळी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब तसेच इतर अधिकारी रात्री व काल सकाळपासून घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राहुल नाईक, सार्वजनिक बांधकाम खाते आदींनी पंचनामा तसेच इतर आढावा घेताना नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगितले. हा अहवाल जिल्हाधिकारी यांना सदर करण्यात येणार आहे.
डिचोलीत रात्री आग लागली त्यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी मदत केली. मात्र या ठिकाणी हायड्रन सोय नसल्याने मोठी गैरसोय झाली येथील युवक गौरव परब गावकर यांनी येथील विद्यालयाच्या इमारतीसाठी असलेला हायड्रन शोधून त्याचे पाणी वापरात आणल्याने मोठी सोय झाली.
आमदार डॉ. शेट्ये यांनी जी घटना घडली ती दुर्दैवी सून सर्व ते मदत कार्य व मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष फळारी यांनी बाजाराला शिस्त आणून अतिक्रमणे हटवणे प्लास्टिकची आच्छादने दूर करण्यात येणार असून हायड्रन व इतर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ही इमारत जुनी व ऐंशी वर्षाची असून वीजवाहिन्या जर्जर झालेल्या आहेत. काहींनी दुकाने भाड्याने दिली असून त्यांची दुरूस्ती करताना अडचणी येत आहेत. या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती तत्परता सरकारी यंत्रणांनी दाखवावी असे व्यापारी राजन नाईक, नरेश कडकडे, महेश येंडे यांनी मागणी केली आहे.
पूर्वीही लागलेली आग
जी आग लागली त्या ठिकाणी यापूर्वी काही वर्षांपूर्वी आग लागली होती. या मार्केट परीसरात एका बाजूला मार्केटमध्ये अग्निशामक दलाचे वाहन जाऊ शकत नाही. सर्व ठिकाणी दुकाने वाढवून अतिक्रमण असल्याने वाहने मदतीसाठी जाऊ शकत नाही अशी अवस्था असून ही अतिक्रमणे हटवण्यात यावीत अशी आग्रही मागणी नरेश कडकडे, नारायण बेतकीकर, गोकुळदास हातमलकर, महेश येंडे, नरहरी सावंत, राजन नाईक आदींनी केली आहे.