सलोखा धोक्यात

0
23

एकमेकांच्या धर्मासंबंधी, वंदनीय व्यक्तिमत्त्वांसंबंधी अकारण अवमानकारक, चिथावणीखोर मजकूर सोशल मीडियावर घालून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे जे प्रकार आजवर देशातील काही राज्यांत होत असत, ते आता गोव्यातही सातत्याने होऊ लागल्याचे जाणवू लागले आहे. या वर्षी राज्यात धार्मिक ताणतणावाचे जेवढे प्रसंग आले, तेवढे आजवर कधीही आलेले नव्हते आणि याची नोंद गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अत्यंत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. राज्याच्या सामाजिक सलोख्याच्या आणि शांततेच्या आजवरच्या अभिमानास्पद वारशाला धक्का लागेल असे वातावरण गोव्यात पूर्वी कधी निर्माणच होत नव्हते असे नव्हे, परंतु ते अपवादात्मक परिस्थितीत होत असे. एखाद्या विषयावरून धार्मिक तणाव निर्माण झाल्यानंतर राजकीय उच्चपदस्थांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही गटांच्या समंजसपणामुळे ते निवळायलाही तेव्हा फारसा वेळ लागत नसे. मात्र, आजकाल जो धार्मिक ताणतणाव सातत्याने डोके वर काढताना दिसतो, तो मात्र अशा समजूतदारपणाच्या पलीकडचा आहे आणि म्हणूनच चिंताजनक आहे. अशी एखादी ठिणगी कधी कुठे उडते हे पाहात टपून बसलेल्यांची आपल्याकडे कमी नाही. राजकारणाच्या पोळ्या भाजायला अशा प्रकारचे अतिसंवेदनशील व ध्रुवीकरण घडविणारे विषय फायदेशीर असल्याने सर्वच राजकीय पक्ष, संघटना, नेते यांची नजर अशा विषयांवर असते. मात्र, त्यातून समाजामध्ये जो विद्वेष पसरवला जातो, जे विष पेरले जाते, त्याचे परिणाम सरतेशेवटी फार भयावह होतात आणि सर्वांनाच भोगावे लागतात. अल्पकालीक लाभासाठी पेटवून घातलेल्या विषयांचे दीर्घकालीक परिणाम लक्षात घेऊन अशा सातत्यपूर्ण घटनांवर वेळीच कठोर उपाययोजना केली गेली नाही, तर आपल्या शांत, सुशेगाद राज्यातही काही वर्षांपूर्वी उसळलेल्या कुडचडे दंगलीसारख्या हिंसक दंगली उसळायला वेळ लागणार नाही. आपल्याला गोव्याला त्या दिशेने घेऊन जायचे आहे काय?
सोशल मीडिया आज सर्वत्र बोकाळलेला आहे आणि त्यात कोणीही उठावे आणि आपल्या मनातील गरळ ओकावी असा एकूण प्रकार आजकाल चालला आहे. रिकामटेकड्यांसाठी तर हा बिनभांडवलाचा उद्योग बनला आहे. जो तो सोशल मीडियावर ‘विचारवंत’ बनून तारे तोडत असतो. अशा महाभागांना तितक्याच उथळ फॉलोअर्सचीही कमी नसते. परंतु यातून सामाजिक वातावरणात सातत्याने विष कालवले जात राहते. मग कधीतरी एखादी चिथावणीखोर पोस्ट येते आणि धुमसत राहिलेल्या ह्या विद्वेषाचा भडका उडतो. एखादी वादग्रस्त पोस्ट टाकून सामाजिक शांतता आणि सलोखा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होण्यासाठी जमावाने पोलीस स्थानकापुढे धाव घेण्याची वेळच मुळात का यावी? राज्याची सायबर पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि सक्रिय होण्याची त्यासाठी आवश्यकता आहे. सोशल मीडीयावरील एखादी वादग्रस्त पोस्ट वेळीच काढून टाकली गेली नाही, तर ती वणव्याप्रमाणे सर्वत्र पसरून काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियाचा वापर आजकाल प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्याच्या दुरुपयोगाची शक्यताही तितकीच वाढली आहे. सोशल मीडियामुळे एखाद्या ठिकाणचा हिंसाचार थांबण्याऐवजी आगीत तेल ओतले गेल्याची उदाहरणेच अधिक दिसतात. त्यामुळे त्यावर नजर ठेवून वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात चालढकल होऊ नये. त्यात आपपरभावही दिसता कामा नये. जे समाजविघातक आहे त्याकडे त्याच नजरेने पाहिले गेले पाहिजे. राज्यात कोणत्याही धर्माविरुद्ध अवमानजनक कृत्य सहन केले जाणार नाही असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत, परंतु त्यांच्या त्या घोषणेला पूरक अशी कृतीही संबंधित यंत्रणांकडून घडली पाहिजे. गोव्यातील सामाजिक वातावरण आजवर कधीही नव्हते एवढे विषारी बनत चालले आहे हे अत्यंत खेदपूर्वक नमूद करावे लागते आहे. त्याला राजकारणी आणि त्यांची ध्रुवीकरणकेंद्रित राजनीतीही तितकीच जबाबदार आहे. क्षुद्र राजकीय लाभासाठी धार्मिक, सामाजिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्यासाठी सरकारने सर्व धर्मांमधील उपद्रवकारक समाजकंटकांच्या याद्या बनवाव्यात. त्यांच्या कारवायांवर यंत्रणांची नजर आहे ह्याची त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेऊन समज द्यावी. राज्यातील सामाजिक, धार्मिक सलोख्याला सुरुंग लावणाऱ्या भलत्या उचापती सहन केल्या जाणार नाहीत हे बजावावे. अशा विघातक प्रवृत्तीवर वेळीच अंकुश आणला गेला नाही तर राज्यात अधूनमधून लागणाऱ्या ह्या आगीचा व्यापक सर्वनाशी वणवा व्हायला वेळ लागणार नाही.