परदेशी खलिस्तानी समर्थकांना दणका

0
7

ओसीआय रद्द करण्याचा भारतचा निर्णय

एनआयएकडून 19 दहशतवाद्यांची यादी जाहीर

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातच आता, भारत सरकारने खलिस्तानी विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. एनआयएने खलिस्तानी समर्थकांची नवी यादी जाहीर केली आहे.

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. भारत सरकारने कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांचे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या कारवाईनंतर हे दहशतवादी भारतात येऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे भारताने परदेशात राहणाऱ्या दहशतवाद्यांच्या संपत्तीचीही ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत.

भारताच्या या निर्णयामुळे दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद करण्यास मदत होणार आहे. तसेच दहशतवाद्यांच्या भारतातील प्रवासावर बंदी येईल. भारत सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिका, यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दणका बसणार आहे. खलिस्तान समर्थक भारतात येऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कॅनडाने पोस्टर काढले
भारताने कॅनडाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता कॅनडाने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. कॅनडाने भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असून, कॅनडा प्रशासनाने खलिस्तानी समर्थकांनी अनेक भागात लावलेले होर्डिंग आणि बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. कॅनडातील एका गुरुद्वारामध्ये भारतीय राजनैतिकाच्या हत्येचे आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हे पोस्टर्स काढले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जपानने यावर सहमती दर्शवलेली नाही. हा कॅनडासाठी मोठा धक्का आहे. भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश आता कॅनडाचा सूर मवाळ होत असल्याचे राजनीतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यादीत 19 जणांची नावे
भारताने अमेरिका, कॅनडा, यूके, यूएस, पाकिस्तान, यूएई आणि इतर देशात राहणाऱ्या 19 खलिस्तानी दहशतावाद्यांची यादी जाहीर केली आहे. यूकेस्थित परमजीत सिंग पम्मा, पाकिस्तानातील वाधवा सिंग बब्बर उर्फ चाचा, कुलवंत सिंग मुथडा (यूके), जेएस धालीवाल (यूएस), सुखपाक सिंग (यूके), हॅरिएट सिंग उर्फ राणा संग (यूएस), सरबजीत सिंग बेनूर (यूके), कुलवंत सिंग उर्फ कांता (यूके), हरजप सिंग उर्फ जप्पी डिंग (यूएस) यांचा यादीत समावेश आहे. रणजित सिंग नीता (पाकिस्तान), गुरमीत सिंग उर्फ बग्गा, गुरप्रीत सिंग उर्फ बागी (यूके), जस्मिन सिंग हकीमजादा (यूएई), गुरजंत सिंग धिल्लन (ऑस्ट्रेलिया), जसबीत सिंग रोडे (युरोप आणि कॅनडा), अमरदीप सिंग पुरेवाल (यूएस), जतिंदर सिंग ग्रेवाल (कॅनडा), दुपिंदर जीत (यूके) आणि एस हिम्मत सिंग (यूएस) यांची नावे यादीमध्ये आहेत. यांची भारतातील संपत्तीदेखील जप्त केली जाणार आहे.