नुकतीच राजधानी दिल्लीत जी-20 शिखर परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकमेकांशी सुहास्यवदनाने झालेल्या चर्चांचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. मात्र, जी-20 परिषदेनंतर व्हिएतनाम दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना जो बायडेन यांनी भारतातील मानवी हक्कांसंदर्भात आणि माध्यम स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त केली.
जी-20 परिषदेच्या निमित्ताने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचे जो बायडेन म्हणाले. यामध्ये भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, त्याचवेळी मानवी हक्कांचा आदर आणि माध्यम स्वातंत्र्य कायम राखण्याचे महत्त्वही आपण अधोरेखित केल्याचे ते म्हणाले.
या दौऱ्यात आपण नरेंद्र मोदींशी सविस्तर चर्चा केली. यात मानवी हक्कांचा आदर राखण्याचे महत्त्व आपण त्यांच्याशी बोलताना अधोरेखित केले. तसेच, नागरी समाज व मुक्त माध्यमे एक बलशाली देश निर्माण करण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतात, यावरही आपण त्यांच्याशी बोललो, असे जो बायडेन यांनी व्हिएतनामच्या हनॉईमध्ये आपल्या संभाषणात नमूद केले.