जी-20 शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप

0
14

मोदींनी सोपवले ब्राझीलकडे पुढील जी-20 चे अध्यक्षपद

भारतात सुरू असलेल्या जी-20 परिषदेचा काल रविवारी (दि. 10) समारोप झाला. या समारोपाला शेवटच्या सत्रात पुढील वर्षीचे जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीची सूत्रे ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डिसिल्वा यांच्याकडे सोपवली. पुढील जी-20 परिषद आता ब्राझीलमध्ये होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ब्राझीलचे राष्टपती डिसिल्वा यांचे अभिनंदनही केले व पंतप्रधानांनी शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा केली.
शिखर परिषदेच्या शेवटच्या सत्रानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, जग बदलत आहे त्यानुसार आता जगातील संस्थांनाही बदलण्याची गरज आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्याचा रोडमॅप आनंददायक असेल. 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो असे सांगून ङ्गस्वस्ति अस्तु विश्वफ या शांततेच्या प्रार्थनेसह परिषदेचा समारोप केला.

यावेळी गेल्या वर्षी जी-20 चे अध्यक्ष असलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि पुढील वर्षी या संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे ब्राझीलचे राष्ट्रपती यांनी पंतप्रधान मोदींना रोपटे भेट दिले.
जी-20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करून झाली. जी-20 नेते आणि भेट देणाऱ्या देशांच्या नेत्यांनी राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांचे खादीची शाल देऊन स्वागत केले. राजघाटाची माहितीही सर्व नेत्यांना देण्यात आली. यानंतर सर्व नेते भारत मंडपमध्ये परतले. तिसऱ्या अधिवेशनादरम्यान जाहीरनाम्याला औपचारिक मान्यता देण्यात आली.

शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
भारत, युरोप आणि मध्य पूर्व यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक कॉरिडॉरवरही करार झाला. यानंतर सर्व पाहुण्यांनी राष्ट्रपतींच्या डिनरला हजेरी लावली. अनेक पाहुणे भारताच्या पारंपरिक पोशाखात दिसले.
या परिषदेसाठी अनेक प्रमुख देशांचे नेते हे भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठकदेखील केली. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

व्हर्च्युअल सत्राचा प्रस्ताव

पंतप्रधान मोदी यांनी, नोव्हेंबरपर्यंत जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. या दोन दिवसांत तुम्ही अनेक गोष्टी आणि प्रस्ताव मांडले आहेत. ज्या काही सूचना येतील त्या स्वीकारण्याची आणि ते कसे ते पाहण्याची जबाबदारी आमची आहे. आपण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जी-20 चे दुसरे व्हर्च्युअल सत्र आयोजित करू. यामध्ये या परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ शकतो. या सर्व गोष्टींचा तपशील आमच्या टीमद्वारे शेअर केला जाईल असे सांगितले. तसेच भारताने आगामी जी-20 चे अध्यक्षपद ब्राझीलला सोपवले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्राझीलला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिले.

भारत कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार ः पंतप्रधान ट्रुडो

भारत-कॅनडा संबंधांबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी, भारत हा कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत ही जगातील एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. हवामान बदलाशी लढा देण्यापासून ते विकास आणि समृद्धी निर्माण करण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीत भारत कॅनडासोबत आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या नेत्यांनी खलिस्तानसह परकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा केली. बैठक संपल्यानंतर ट्रुडो यांनी खलिस्तान मुद्द्यावर बोलताना आपले मत मांडले. परंतु आम्ही हिंसाचार आणि द्वेष पसरविण्याच्या विरोधात आहोत. काही लोक संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. कॅनडा नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो. द्विपक्षीय बैठकीत खलिस्तानी अतिरेकी आणि परदेशी हस्तक्षेप, या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत हा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे. आम्ही नेहमीच हिंसाचार थांबवण्यासाठी आणि द्वेष कमी करण्यासाठी उभे आहोत. असे सांगितले.

फ्रान्ससोबत बैठक

जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली. या बैठकीनंतर मॅक्रॉन यांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. या बैठकीसंदर्भात ट्विट करत पंतप्रधानांनी माहिती देताना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत बैठकीत आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली असून भारत आणि फ्रान्स प्रगतीचे नवीन विक्रम रचतील असा विश्वास व्यक्त केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी फ्रान्स भारतासोबत संरक्षण सहकार्य आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करेल असे सांगून त्यांनी भारताने केलेल्या जी-20 परिषदेच्या आयोजनाचे कौतुक केले.