जलस्रोतमंत्र्यांच्या वक्तव्याला म्हादई बचाव अभियानची हरकत

0
99

म्हादई पाणीतंटा प्रश्‍न लवादाच्या कक्षेबाहेर चर्चेद्वारे सोडविण्यास अनुकूल असल्याचे राज्याचे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी म्हटले असून त्यांच्या या वक्तव्याला म्हादई बचाव अभियानने तीव्र हरकत घेतली आहे. लवादासमोर सुनावणी अंतिम टप्प्यात पोचली असून गोव्याची बाजू भक्कम असताना न्यायालयाच्या कक्षेबाहेर प्रश्‍न सोडवण्यास तयारी दर्शविणे म्हणजे गोव्याची बाजू कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे अभियानचे सचिव राजेंद्र केरकर यांनी सांगितले.
म्हादई प्रश्‍नावर जलसंसाधनमंत्री विनोद पालयेकर यांनी पूर्ण अभ्यास करून आधी विषय समजून घ्यावा. म्हादईचा उगम व नदी वाहत असलेल्या खोर्‍यांची पाहणी करावी व मगच म्हादईसारख्या अतिशय महत्त्वपूर्ण व गोव्याच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या प्रश्‍नावर वक्तव्य करावे असा सल्ला म्हादई अभियानने दिला आहे. लवादासमोर गोव्याची बाजू अतिशय भक्कम आहे. गोव्याचे पथक कर्नाटकाला जेरीस आणत आहे. अशा परिस्थितीत कोणताही अभ्यास न करता म्हादई प्रश्‍नावर बेताल वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे श्री. केरकर म्हणाले.
कर्नाटकाने म्हादईचा प्रवाह वळवण्याचा चंग बांधलेला आहे. अशा स्थितीत जलस्त्रोतमंत्र्यांनी अचानक मध्यस्थीचा सुर लावणे हे धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले.