जी-20 बैठक आमच्या देशात कुठेही घेण्याचा आम्हाला अधिकार ः मोदी

0
8

>> चीन, पाकिस्तानला ठणकावले

आम्हाला आमच्या देशाच्या कोणत्याही भागात बैठक घेण्याचा अधिकार आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला फटकारले आहे. काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठक घेण्यावर पाकिस्तान आणि चीनने घेतलेला आक्षेप फेटाळून लावताना मोदी यांनी वरील वक्तव्य केले आहे.

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी काश्मीरच्या काही भागात जी-20 कार्यक्रम आयोजित करण्यावर आक्षेप घेतला होता. काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे, त्यामुळे येथे कार्यक्रम होऊ नये, असे दोन्ही देशांनी म्हटले होते. या आक्षेपावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी, आम्ही काश्मीर आणि अरुणाचलमध्ये बैठक घेण्याचे टाळले असते तर असा प्रश्न योग्य ठरला असता. देशात जी-20 ची बैठक होत असताना देशाच्या प्रत्येक भागात बैठका होणार हे स्वाभाविक आहे असे म्हटले आहे.

यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी चीनने नकाशा जारी करून अरुणाचल आणि अक्साई चीनला आपला हिस्सा घोषित केले होते. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला चीनच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणूनही पाहिले जात आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सोशल मीडियावर नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यात चीनने भारताचा काही भाग आपला भाग दाखवला होता.

चांद्रयान-3 शास्त्रज्ञांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. येथे त्यांनी 3 घोषणा केल्या. त्यात भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करेल. चंद्रावर लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला शिव-शक्ती पॉइंट म्हटले जाईल. तिसरा चंद्रावरील ज्या बिंदूवर चांद्रयान-2 चे ठसे आहेत, त्याला ‘तिरंगा’ असे नाव दिले जाईल असे सांगितले.