पणजी – बेळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 748 म्हणजे पूर्वीच्या एनएच 4 ए च्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे खोर्ली ते भोम या भागात अडले आहे. आता ह्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या विरोधात भोमवासीय दंड थोपटून उभे राहिले आहेत आणि त्यांना गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंपासून आर.जी.च्या वीरेश बोरकरपर्यंत राजकीय नेतेमंडळींची साथ मिळताना दिसते आहे. वास्तविक, पणजी – फोंडा मार्गाने ये जा करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी खोर्ली – भोम – कुंडई हा अद्याप चौपदरीकरण न झालेला भाग ही मोठी डोकेदुखी होऊन राहिलेली आहे. कदंब पठारावरील चौपदरी महामार्गावरून सुसाट जावे आणि खोर्ली आणि भोमच्या कोंडीत अडकावे हा प्रवाशांचा नित्याचा अनुभव बनला आहे. एकीकडे राज्यातील सर्व महामार्गांचा विस्तार आणि चौपदरीकरण सुरळीत सुरू असताना आणि त्यामुळे वाहतुकीला मोठी सुलभता प्राप्त झालेली असताना, ह्या एवढ्याच भागामध्ये हे काम अडल्याने त्या परिसरात नित्य वाहतुकीचा प्रचंड खेळखंडोबा होत असतो. त्यातच खोर्ली आणि भोमच्या बसथांब्यावर प्रवासी बसगाड्या भररस्त्यात बिनदिक्कत उभ्या केल्या जात असल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि तासन्तास खोळंबा ही नेहमीची बाब झाली आहे. असे असतानाही महामार्ग चौपदरीकरणास स्थानिक पातळीवर हा विरोध होताना दिसतो, त्यामागे वस्तुस्थितीचे भान कमी आणि चिथावणीला बळी पडणे अधिक असल्याचेच दिसते. या चौपदरीकरणाचा फटका केवळ चार घरांना बसणार आहे हे सरकारने सप्रमाण दाखवून दिले आहे. साबांखामंत्र्यांनी जातीने या विषयात लक्ष घालून द्रोनद्वारे चित्रीकरण करून स्वतः सादरीकरण केले. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या श्रीसातेरी व शिवमंदिराला रुंदीकरणापासून काही धोका नाही, कारण हे चौपदरीकरण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने होणार आहे हेही त्यांनी सप्रमाण सांगितले. वास्तविक भोम येथील हे सातेरी मंदिर पूर्वी छोटेखानी स्वरूपात होते. काही वर्षांपूर्वीच ते भव्य प्रमाणात बांधले गेले. वाढत्या वाहतुकीसरशी महामार्गांचा विस्तार होणे अपेक्षित असताना मुळात अशा बांधकामांना परवानगी कशी मिळते हाही प्रश्न विचार करण्याजोगा आहे. पर्वरीतही अशाच प्रकारे महामार्ग विस्तार प्रलंबित असताना बांधकामांचे पेव फुटले. मोठमोठी शोरूम्स उभी राहिली. भररस्त्यात बहुमजली मॉल उभा राहिला. परिणामी आज पर्वरीत वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले दिसतात. खोर्ली ते भोम परिसरात काही वेगळे चित्र नाही. घरे वाचवून बगलरस्ता काढावा अशी मागणी भोमवासीयांची केली. प्रकल्पबाधितांकडून अशी मागणी पुढे येणे अस्वाभाविकही नक्कीच नाही, परंतु सरकारने अशा विषयात काय भूमिका घ्यावी, राजकीय नेत्यांनी काय भूमिका घ्यावी हे वस्तुस्थितीच्या अभ्यासातून ठरले पाहिजे, मतांच्या हिशेबाने नव्हे. ओल्ड गोव्याहून फोंड्याकडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा रस्ता बाणस्तारी पूल ओलांडल्यावर दक्षिणेच्या दिशेने वळतो. भोम येथील महानंदू नाईक मेमोरियल हायस्कूल ते कुंडई येथील वैशाली रेसिडेन्सी दरम्यान ह्या रस्त्याने एक मोठा अर्धगोलाकार वळसा घेतलेला आहे. विशेषतः सातेरी मंदिरासमोरही मोठे वळण आहे. नागरिकांची घरे मोठ्या प्रमाणात जात असती, तर ह्या सध्याच्या वळणदार रस्त्याऐवजी सरळ बगलरस्ता काढता येऊ शकेल का ह्याचा विचार व्हायला हरकत नव्हती, परंतु प्रत्यक्षात जे चौपदरीकरण होणार आहे, ते सरकारने 1992 साली संपादित केलेल्या जमिनीत. आता ह्या सरकारी जमिनीत कोणी अतिक्रमण केलेले असेल आणि ते तोडले जाणार असेल तर त्यात गैर काय? फोंडा ते जुने गोवे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे घोडे गेली कितीतरी वर्षे अडलेले आहे. पूर्वी जुने गोवे येथील दर्ग्याजवळ रस्त्याच्या मधोमध एक टपरी प्रकल्पाला वाकुल्या दाखवत उभी होती. ते प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यामुळे चौपदरीकरण येऊन त्या टपरीजवळ थांबल्याचा विचित्र प्रकार पाहायला मिळत होता. तत्कालीन सरकारने खमकी भूमिका घेत ती टपरी रातोरात हटवली आणि विस्ताराचे काम मोकळे केले. कधीकधी अशी खमकी भूमिकाही सरकारनेही घेणे आवश्यक असते. सध्या जो विषय तापला आहे, त्यासंदर्भात हैदराबादच्या आरवी असोसिएटस्ने ह्या चौपदरीकरणाचा सविस्तर आराखडा बनवलेला आहे. आता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असताना जनतेच्या नथीतून तीर मारत हा विरोध होतो, त्यात राजकारण अधिक दिसते. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे काहींना श्रीपाद नाईकांना लक्ष्य करायचे आहे. जनतेचा विरोध हा गैरसमजातून होत असल्याचे दिसते. जनता रस्त्यावर येते, तेव्हा नेहमी तिचेच बरोबर असते असे नव्हे. त्यामुळे असे विषय सरकारने जनतेला पुरेसे विश्वासात घेऊन हाताळले तर हा संघर्ष नक्की टळेल.