भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनने पुन्हा एकदा दावा केला आहे. यावेळी चीनने नवा नकाशा जाहीर केला असून, यामध्ये अरुणाचल प्रदेश यासह अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्राचा बहुतांश भाग असल्याचे नकाशात दाखवले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आगळीकीविरोधात जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
भारतीय पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. भारताने सनदशीर मार्गाने चीनच्या कथित ङ्ग2023 अधिकृत नकाशाफला आक्षेप नोंदवला आहे. या नकाशातून भारताच्या भूभागावर दावा करण्यात आला असून, तो दावा आम्ही फेटाळून लावला आहे. कारण त्याला कोणताही आधार नाही, असे बागची यांनी म्हटले आहे.
चीनच्या स्टँडर्ड मॅप सर्व्हिस या संकेतस्थळावर नैसर्गिक संसाधन खात्याकडून चीनचा 2023 चा अधिकृत नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे, अशी माहिती चीनचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने ट्विट करून दिली आहे. हा नकाशा चीन आणि जगातील इतर देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारित आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जाहीर झालेल्या नव्या नकाशानुसार अरुणाचल प्रदेश, दक्षिण तिबेट, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण सागरी भाग चीनचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील 11 गावांचे नामकरण केले होते. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता नव्या नकाशात भारताचा भाग दाखवण्यात आल्याने पुन्हा एकदा सीमेवर वातावरण तापण्याची शक्यता आहे.