अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप प्रकरणात रीतसर अटक झाली. काही वेळातच त्यांची वीस लाख अमेरिकी डॉलरच्या जामिनावर सुटका जरी झालेली असली, तरी अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात अशा प्रकारे अटक झालेले ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अटक झालेल्या प्रत्येक गुन्हेगाराचे छायाचित्र घेतले जाते, तसे ट्रम्प यांचेही रीतसर छायाचित्र घेतले गेले आणि त्यांना कैदी नंबर मिळाला पीओ1135809. अमेरिकेच्या इतिहासातील आजवरच्या 45 राष्ट्राध्यक्षांमध्ये अशा प्रकारच्या मानहानीला सामोरे जावे लागलेले ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. रीचर्ड निक्सन यांच्यावर ते राष्ट्राध्यक्ष असताना फौजदारी गुन्हा नोंदवला गेला होता, परंतु त्यानंतरचे राष्ट्राध्यक्ष फोर्ड यांनी त्यांना त्यांना माफी बहाल केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मात्र हे संभवत नाही, कारण पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा उतरण्याच्या तयारीत ते आहेत आणि ज्या प्रकारे बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या वाटचालीत त्यांनी अडथळे आणले ते पाहता त्यांना माफी देण्यासाठी बायडन कदापि तयार होणार नाहीत. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची एकूणच कारकीर्द वादळी ठरली होती. त्यांच्यावर महाभियोगही आला होता. डेमोक्रॅटस्चे बहुमत असलेल्या खालच्या संसदेने तो तेव्हा संमत केला, पण रिपब्लिकनांचे बहुमत असलेल्या सिनेटने फेटाळल्याने ट्रम्प वाचले होते. त्यांच्याविरुद्ध सध्या अनेक फौजदारी खटले दाखल आहेत. त्यांचे राष्ट्राध्यक्षपद जाऊन जेव्हा ज्यो बायडन निवडून आले, तेव्हा लोकशाही तत्त्वाचा आदर राखून निमूट सत्तांतर न करता ट्रम्प यांनी अक्षरशः आपल्या समर्थकांकरवी राजधानीत दंगल घडवली होती. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात मतमोजणी सुरू असताना आत दंगेखोर घुसवले होते आणि धुडगूस घालून परतणाऱ्यांना ‘तुम्ही आमच्यासाठी खूप खास आहात’ असे सांगत चिथावणीही दिली होती. महिलांशी कथित संबंधांची त्यांची प्रकरणे तर त्यांना वारंवार गोत्यात आणून गेली. कधी स्टॉर्मी डॅनियल, कधी कॅरन मॅकडगल, कधी ईजिन कॅरोल अशा स्त्रियांनी त्यांना पेचात पकडले आणि त्यांची तोंडे बंद करण्यासाठी ट्रम्प यांना भरपूर पैसा ओतावा लागला. कॅरनला नॅशनल एन्क्वायरर नियतकालिकामार्फत दीड लाख डॉलर दिले गेल्याचे आणि स्टॉर्मी डॅनियलला 2006 च्या त्या प्रकरणासाठी 2016 साली वकिलामार्फत तशीच लाखोंची भरपाई दिल्याचे उघड झाले. स्टॉर्मी प्रकरणातील आरोप ट्रम्प यांनी मान्य केलेला नसला तरी तो खटला सुरू आहे. राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावरही संवेदनशील कागदपत्रे थेट फ्लोरिडातील आपल्या खासगी इस्टेटीत घेऊन गेल्याच्या प्रकरणातही ट्रम्प यांच्यावर खटला सुरू आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या गेल्या निवडणुकीत जॉर्जियामधील मते आपल्याकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या फोनचे चौथे प्रकरणही काल त्यांना शेकले. ह्या चारही प्रकरणात ट्रम्प यांना वेळोवेळी पोलिसांपुढे शरणागती पत्करावी लागली. कायद्याच्या भाषेत जोपर्यंत एखाद्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते. त्यामुळे ट्रम्प यांना न्यायालयाने अद्याप दोषी धरलेले नसल्याने ह्या सगळ्या प्रकरणांचा त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पुढील निवडणुकीवर परिणाम सध्या तरी संभवत नसला, तरी ही सारी प्रकरणे ऐन निवडणुकीच्या मोसमात त्यांच्यासाठी अडचणी उभी करू शकतात. काल त्यांचे गुन्हेगार म्हणून जे छायाचित्र घेतले गेले, त्याचा वापर त्यांचे समर्थक आणि विरोधक या दोहोंकडून केला जाईल. ट्रम्प यांच्या समर्थकांनी त्यांच्याविरुद्ध खटले भरले गेले तेव्हा ते निर्दोष असल्याचे सांगणारी टी-शर्ट विकून निवडणूक निधी गोळा केला होता. जेव्हा जेव्हा ट्रम्प यांच्यावर खटले भरले गेले, तेव्हा त्यांचे निवडणुकीसाठीचे निधीसंकलन वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या छायाचित्राचा वापर करून त्यांचे निवडणूक प्रचारक त्यांच्यासाठी निधी उभारणी करतील आणि त्यांचे विरोधक ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा येण्यास कसे लायक नाहीत हे सांगण्यासाठी ते वापरतील. हे महाभारत आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणूककाळात निश्चितच रंगेल. गेल्या एप्रिलमध्ये ट्रम्प यांना स्टॉर्मी प्रकरणात न्यूयॉर्क पोलिसांपुढे शरण जावे लागले, जूनमध्ये गोपनीय कागदपत्र प्रकरणात मायामीला शरणागती पत्करावी लागली. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन दंगलप्रकरणात आणि आता निवडणूक गैरप्रकारात पुन्हा शरणागती पत्करून ट्रम्प यांनी आपण भूषविलेल्या महाशक्तिमान पदाची रयाच घालवली आहे. महासत्ता अमेरिकेच्या सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या व्यक्तीला अशा निवडणूक गैरप्रकारांच्या आणि लैंगिक दुर्व्यवहाराच्या खटल्यांना सामोरे जावे लागणे हे त्या महासत्तेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारे आहे.