देवदर्शनानंतर राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण

0
5

>> शांतादुर्गा देवस्थान, महालसा नारायणी देवस्थान व जुने गोवेतील चर्चला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कवळे-फोंडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थान, वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवस्थान, जुने गोवे येथील चर्चला भेट दिल्यानंतर नवी दिल्लीकडे प्रयाण केले. दाबेोळी येथील आयएनएस हंसा तळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी त्यांना निरोप दिला.

राष्ट्रपतींचे 22 ऑगस्टला तीन दिवसांच्या गोवा भेटीवर आगमन झाले होते. त्यांनी या दौऱ्यात गोवा विधानसभेत लोकप्रतिनिधींना संबोधित केले. तसेच गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभाग आणि आदिवासी समाजातील नागरिकांशी संवाद साधला.

राष्ट्रपतींनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस चर्चला भेट दिली. त्यानंतर कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. तसेच, वेर्णा येथील महालसा नारायणी देवस्थानला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची उपस्थिती होती.

जीव्हीएमच्या विद्यार्थ्यांशी संवाद

कालच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फर्मागुडी-फोंडा येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या (जीव्हीएम) महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला आकस्मिक भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कवळे-फोंडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात जात असताना राष्ट्रपतींना फर्मागुडी-फोंडा येथील रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उभे असलेले दृष्टीस पडले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी हात उंचावून राष्ट्रपतींना अभिवादन केले.

यावेळी आपला ताफा थांबवून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रपती गाडीतून खाली उतरल्या. त्यांचा ताफा अचानक थांबल्याने पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली.
यावेळी राष्ट्रपतींनी महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, त्यांना छायाचित्र घेण्याची संधी दिली. तसेच एका मुलीला भेटवस्तू देखील दिली. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती.