विकासाच्याबाबतीत गोवा आदर्श राज्य

0
8

>> राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

>> गोवा विधानसभेत संबोधन

विकासाच्याबाबतीत गोवा हे एक आदर्श असे राज्य असून गोव्याने ज्या प्रकारे विकास साधला आहे त्या प्रकारे विकास साधण्याकडे अन्य राज्यांनी लक्ष द्यायला हवे, असे उद्गार काल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न 2047 पर्यंत पूर्ण व्हायला हवे व भारत सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे, असे मुर्मू यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. काल गोवा विधानसभेला संबोधित करताना त्यांनी वरील उद्गार काढले.

गोव्याविषयी बोलताना पुढे त्यांनी, गोवा राज्य पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाले तेव्हाच भारत देश खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र झाला. गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉ. टी. बी. कुन्हा, राममनोहर लोहिया, मोहन रानडे आदी कित्येक स्वातंत्र्यसेनानींनी अथक प्रयत्न केल्याचे सांगितले. गोवा हा लोहखनिजासह अन्य खनिजांनी समृद्ध असा प्रदेश आहे. त्याशिवाय निसर्ग सौंदर्यामुळे गोव्यात पर्यटन व्यवसायही वृद्धिंगत झाला आहे. गोवा हे फार्मास्युटिकलच्याबाबतीत देशातील चौथे सर्वांत मोठे केंद्र आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याशिवाय आयटी व अन्य उद्योगही आता राज्यात उभे होऊ लागले असल्याचे मुर्मू यांनी नमूद केले.

भारत पाचवी अर्थ व्यवस्था
देशाविषयी पुढे बोलताना राष्ट्रपतींनी भारत ही जगातील सर्वांत मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने पुढे सरकू लागली असल्याचे यावेळी पुढे बोलताना सांगितले.
काल संध्याकाळी राष्ट्रपतींचे 3.45 वा. गोवा विधानसभा आवारात आगमन झाले. यावेळी सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींनी त्यांचे स्वागत केले.

कृषीसोबतच औद्योगिक
क्षत्रातही विकास ः सभापती

गोव्यात सबका साथ सबका विकास या तत्त्वावर विकास चालू आहे. राज्यात कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रातही विकास साधला जात असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. गोव्याची समृद्ध अशी संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवून ती पुढील पिढ्यांसाठी जपण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले. राज्याच्या प्रशासनात पारदर्शकता असून सबका साथ सबका विकास या तत्त्वावर विकास केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

नियोजनबद्ध विकास ः मुख्यमंत्री
गोवा राज्याचा विकास साधण्यासाठी गोवा सरकारने व्हिजन गोवा 2047 तयार केला असून त्यानुसार नियोजनबद्धरित्या राज्याचा विकास करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेखाली गोवा सरकारने स्वर्यपूर्ण गोवा ही योजना सुरू केली आहे.

या विकासाची फळे सर्वांना मिळावीत यासाठी अंत्योदय तत्त्वावर काम करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी नवे नवे उद्योग गोव्यात सुरू केले जात आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गासाठी एप्रेंन्टिशीप योजना सुरू करण्यात आली असून युवा वर्गाला त्याद्वारे कुशल बनवण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘स्किलिंग रिस्किलिंग आणि अप स्किलिंग’ याद्वारे त्यांची कुशलता वेगाने वाढवण्यावर भर देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या राष्ट्रपती आज गोवा विधानसभेला संबोधित करणार असल्याचे आजचा दिवस हा गोव्यासाठी गौरवशाली असा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरासोबतच ग्रामीण भागातही
गोव्याचा विकास ः राज्यपाल

यावेळी बोलताना गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी, गोवा हे एक आदर्श असे राज्य आहे. गोव्यात शहरांएवढाच ग्रामीण भागांतही विकास झालेला असून गोव्यासाठी ही एक अभिमानाची अशी बाब आहे. गोव्यातील सचिवालय, गोव्यातील राजभवन व गोव्यातील विद्यापीठ ग्रामीण भागात असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील लोक हे शांतताप्रेमी आहेत असा उल्लेख करून त्यामुळे राज्यात कधीच धार्मिक कलह अथवा दंगे झाले नसल्याचे ते पुढे म्हणाले. आमची एकता, बंधुभाव हा असाच जपून ठेवायला हवा, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. नेत्यांनी आपण लोकांचे सेवक आहोत या भावनेने काम करायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.