चांद्रयान-3 आज उतरणार चंद्रावर

0
25

>> सायंकाळी 5.20 पासून थेट प्रक्षेपण

>> सायंकाळी 6.04 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग

>> इस्रोचे शास्त्रज्ञ सज्ज; देशवासियांत उत्सुकता

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्र मोहीम आता अगदी अंतिम टप्प्यावर असून, चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर सध्या 25 किमी. बाय 134 किमी.च्या कक्षेत फिरत असून, बुधवार दि. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग होणार असल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे. त्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ सज्ज असून, विक्रम लँडरची स्थिती पाहून या यानाचे चंद्रावर लँडिंग करण्यात येणार आहे. हे यान यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याचा विश्वास देखील इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेचे थेट प्रक्षेपण 5 वाजून 20 मिनिटांनी पाहता येणार आहे. त्यामुळे सर्व भारतीय या सुवर्णक्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.

श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 ने अंतराळात झेप घेतली होती. त्यानंतर विविध टप्पे पार करत आता चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यापासून अगदी काही अंतर दूर आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे. इथे अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचे लँडिंग करणे हे इस्रोसाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे इस्रोच्या शास्रज्ञांनी या यानाची रचनाच अशा प्रकारे केली आहे की या सर्व परिस्थितीमध्येही हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल. तसेच याच परिस्थितीमुळे यानामध्ये जास्त इंधनसाठा देखील समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच हे यान देखील मजबूत करण्यात आले आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीमध्ये यानाला धक्का पोहचणार नाही.
कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवलेले नाही. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे. दक्षिण ध्रुवावर भारताचे यान उतरुन तेथील संशोधन करणार आहे. तसेच तेथील माहिती ते इस्रोकडे पाठणार आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत याचा शोध भारत लावणार आहे.

चांद्रयान-3 चा विक्रम लँडर 25 किलोमीटर उंचावरुन चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला साधारणपणे 11 मिनिटे लागतील.

  • यानंतर चांद्रयान-3 चंद्रापासून 7.4 किमी. अंतरावर असेल. या अंतरावर चांद्रयानाची गती 358 मीटर प्रति सेकंद इतकी असेल.
  • त्यानंतरचा पुढील टप्पा 6.8 किमी. अंतर असेल. याठिकाणी वेग आणखी कमी केला जाईल. तिथे वेग 336 मीटर प्रति सेकंद वेग असेल.
  • त्यानंतरचा पुढील टप्पा 800 मीटर असेल. या टप्प्यावर पोहोचल्यावर चांद्रयानावरील सेन्सर्सकडून लेझरच्या किरणांद्वारे चंद्रावर उतरण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यात येईल.
  • 150 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरची गती 60 मीटर प्रति सेकंद असेल. तिथून पुढे लँडरची गती 40 मीटर प्रति सेकंद असेल. ही गती चंद्रापासून 60 मीटर अंतर उंचावर असताना असेल.
  • तिथून पुढे 10 मीटरच्या अंतरावर असताना लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद असेल. चंद्रावर सुरक्षित लँडिंग करण्यासाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद असेल.

…तर 27 ऑगस्टला चांद्रयान-3 चे लँडिग
इस्रोच्या अहमदाबाद केंद्राचे प्रमुख नीलेश एम. देसाई यांनी चांद्रयान-3 संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. 23 ऑगस्ट रोजी लँडिंगच्या काही तास आधी हा निर्णय घेण्यात येईल की, लँडिंगसाठी ही वेळ योग्य आहे की नाही. तसेच हे लँडिंग मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थितीवर देखील अवलंबून आहे. जर परिस्थिती अनुकूल नसेल, तर हे लँडिंग 27 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. मात्र 23 ऑगस्ट रोजी लँडिंगसाठी कोणतीही समस्या येणार नसल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

चांद्रयान- 3 चंद्रावर उतरल्यानंतर पुढे काय?

  • चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच विक्रम लँडरचा एक साईड पॅनल दुमडला जाईल, ज्यामुळे प्रग्यान रोव्हरला चंद्रावर उतरण्यासाठी रस्ता मोकळा होईल.
  • रोव्हर खराब होऊ नये याच दृष्टीने लँडरची निर्मिती करण्यात आली आहे, जेणेकरून तो चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. हे रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्रावर फिरून त्याची छायाचित्रे गोळा करेल.
  • या रोव्हरवर इस्रोचे बोधचिन्ह आणि भारतीय तिरंगा लावण्यात आला आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावर चार तासांनी लँडरमधून बाहेर पडेल.
  • इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर चालेल. या दरम्यान रोव्हरची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या बोधचिन्हाची छाप सोडतील.
  • रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर 1 सेंटीमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरेल. यादरम्यान कॅमेऱ्यांच्या मदतीने रोव्हर चंद्रावर असलेल्या गोष्टी स्कॅन करेल.
  • रोव्हर चंद्राच्या हवामानाची माहिती घेईल. त्यात असे पेलोड्स बसवण्यात आले आहेत, ज्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची चांगली माहिती मिळू शकेल. चंद्राच्या भूपृष्ठाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉनचे प्रमाण देखील शोधण्याचे काम तो करेल.
  • रोव्हर ही माहिती गोळा करून लँडरला पाठवेल. रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञांपर्यंत ही माहिती केवळ लँडरमार्फतच पोहचू शकते.
  • चांद्रयान-3 चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस कार्यरत राहील.