शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचे येत्या 24 रोजी गोव्यात दवर्ली मडगावात व्याख्यान होणार आहे. संभाजी भिडे हे धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषणे करणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गोव्यात येण्यास त्यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कामकाज समितीवरील निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची करण्यात आलेली विटंबना, फादर बोलमॉक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवरायांविरोधात काढलेले अनुद्गार यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भिडे यांचे व्याख्यान गोव्यात होत असून त्यांनी जर जातीय तेढ निर्माण होईल असे भाषण केले तर राज्यात जातीय दंगली उसळतील असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे.