रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळल

0
71

रशियाच्या चांद्रमोहिमेला धक्का

चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाल्याने यान क्रॅश

रशियाचे लुना-25 हे अंतराळयान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले असल्यामुळे रशियाची चंद्रमोहीम अपयशी ठरली आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रशियाचे लुना-25 अंतराळयान आज सोमवारी 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र रशियाची ही मोहीम अयशस्वी ठरली.

20 ऑगस्ट रोजी रात्री लुना-25 हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरू करत दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, इंजिनाचे प्रज्वलन झाले नाही त्यामुळे लुना-25 हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्थेने दिली.

रशियाने तब्बल 47 वर्षानंतर चंद्रमोहीम हाती घेतली होती. रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लुना-24 हे अंतराळयान पाठवले होते. त्या मोहिमेनंतर तब्बल 47 वर्षांनी प्रथमच लुना-25 अंतराळात पाठवले होते. सदर यानाने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे ‘लुना-25′ यान 11 दिवसांत म्हणजे आज दि. 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार हाते. अधिक शक्तिशाली व खर्चिक अशी ही रशियाची मोहीम होती. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचले होते. मात्र चंद्र मोहीम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झाले.

चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर
रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने दिलेल्या माहितीनुसार अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना-25 अंतराळ यान चंद्रावर कोसळले. लुना-25 नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. लुना-25 ला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये असताना तांत्रिक समस्या उद्भवली होती. त्यानंतर एक दिवसाने लुना-25 कोसळल्याची माहिती समोर आली.

दोन चांद्रमोहिमा
जगात चंद्राबाबत दोन मोहिमा सुरू होत्या. त्यात इस्रोची चांद्रयान-3 आणि रशियाची लुना-25 यांचा समावेश होता.

भारताच्या चांद्रयानकडे लक्ष

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3कडे आता सर्व जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्युलला चंद्राच्या जवळ आणण्यासाठी अंतिम डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे.

चंद्रापासून 25 किमी अंतरावर
चांद्रयान-3 ला चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. आता विक्रम लँडर हळूहळू त्याचा वेग कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जात आहे. चांद्रयान-3 ने काल रविवारी पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान महत्त्वाचा टप्पा पार केला त्यामुळे आता चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. ‘चांद्रयान-3′ साठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. ‘चांद्रयान-3’ सोबत पाठवलेले विक्रम लँडर व्यवस्थित आहे. चांद्रयान योग्य पद्धतीने चंद्राच्या दिशेने जात आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने दिली आहे. चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. लँडिंग करण्यापूर्वी, मॉड्यूलची तपासणी होईल.