अमरनाथ यात्रेकरूंवर जवळजवळ पंधरा वर्षांनंतर सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. काश्मीर प्रश्नाशी काही देणेघेणे नसलेल्या निःशस्त्र यात्रेकरूंवर झालेला हा हल्ला अत्यंत भ्याडपणाचा तर आहेच, शिवाय ‘कश्मिरीयत’ ला लाजेने मान खाली घालायला लावणाराही आहे. अमरनाथ यात्रा हा काश्मीरच्या परंपरेचा भाग मानला जातो. हजारो वर्षांपासून ती सुरू आहे. आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंदांपासून शेकडो संत महंतांनी आजवर ही यात्रा करून तिचे गुणगान गायिले आहे. दहशतवादाचा धोका असूनही दरवर्षी भाविक आस्थेने आणि निर्भयपणे या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपर्यातून जात असतात. प्रतिकूल हवामानाचा आणि खडतर परिस्थितीचा सामना करीत तेरा हजार फुटांवरील गुहेतील बर्फाच्या निसर्गनिर्मित शिवलिंगाचे मनोभावे दर्शन घेत असतात. पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर शेकडो स्थानिकांची रोजीरोटी तर या यात्रेवर चालतेच, परंतु पिढ्यानपिढ्या हे स्थानिक लोक या यात्रेकरूंची सेवा करीत आलेले असल्याने त्यांच्याप्रती आस्था आणि ममत्वाचीच भावना त्यांच्यात असते. ही गुंफा जवळजवळ शतकभर अज्ञात होती. तिचा शोध पहलगामहून सात किलोमीटरवरील बालकोटे गावातील मलिक नामक एका मुसलमान मेंढपाळाला लागला. आजही या अमरनाथ यात्रेच्या उत्पन्नाचा एक तृतियांश वाटा त्या मलिक कुटुंबाला दिला जातो. उरलेल्या उत्पन्नाचा एक भाग श्रीनगरच्या दशमनी आखाड्याच्या महंतांकडे, तर उरलेले उत्पन्न मट्टनच्या सूर्यमंदिराच्या पांड्यांना मिळतेे. पाकिस्तानच्या पाठबळावर उड्या मारणार्या दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर गोळीबार करणे म्हणजे काश्मीरच्या आतिथ्यशीलतेवर आणि उदारमतवादी संस्कृतीवरच गोळ्या चालवण्यासारखे आहे. हे यात्रेकरू बालटाल मार्गे यात्रा पूर्ण करून परतत होते. श्रीनगरहून कटराच्या दिशेने चालले होते. म्हणजे यात्रेकरूंच्या वाहनांच्या ताफ्यात ते नव्हते. त्यामुळे त्यांना कोणतीही सुरक्षा नव्हती. दहशतवादग्रस्त दक्षिण काश्मीरमध्ये विनासुरक्षा रात्री उशिरा ते परतत होेते. ही बेफिकिरीच त्यांच्या जिवावर बेतली आहे. अमरनाथ यात्रेला जाणार्या यात्रेकरूंची बेस कॅम्पवर रीतसर नोंदणी होत असते आणि त्यांच्या वाहनांना ताफ्यानेच सोडले जाते. पूर्वी यात्रेकरूंवर झालेले सर्वांत भीषण हल्ले हे या बेस कॅँपवरच झालेले आहेत. पहलगामच्या नुनवान बेस कँपवर २००० साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात तब्बल तीस यात्रेकरू ठार झाले होते. त्यानंतरी अधूनमधून हल्ले झाले, परंतु गेली जवळजवळ पंधरा वर्षे यात्रेकरूंना लक्ष्य करण्यात आलेले नव्हते. गेल्या वर्षी मारला गेलेला दहशतवादी बुरहान वानी असो किंवा हुर्रियत कॉन्फरन्सचा पाकिस्तानवादी नेता सय्यद अली शाह गिलानी असो, अमरनाथ यात्रेकरूंना सुरक्षेची ग्वाही त्यांनी दिलेली होती. गिलानीने या वर्षीही अमरनाथ यात्रेकरूंचे स्वागत केले होते. असे असूनही यावेळी झालेला हल्ला हा दहशतवाद्यांच्या भोवती कारवाईचे पाश आवळले जात असल्याने आलेल्या वैफल्याचीच परिणती आहे. लष्कर ए तोयबाने हिज्बूल मुजाहिद्दीनच्या मदतीने हा हल्ला चढवल्याचा संशय आहे. आम काश्मिरी जनतेमध्ये या हल्ल्याविषयी नाराजीच व्यक्त होईल. आताही हुर्रियतच्या नेत्यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केलेला आहे. परंतु तरीही अशा प्रकारचा हल्ला होतो याचा अर्थ पाकिस्तान समर्थित दहशतवाद या फुटीरतावादी मंडळींच्या नियंत्रणात नाही. पाकिस्तानने आजवर या फुटीर मंडळींना पुरेपूर वापरून घेतले, परंतु त्यातून काही साध्य होत नाही हे पाहून आता हिज्बूलला हाताशी धरले आहे. परंतु सुरक्षा दलांनीही गोळीला गोळीने उत्तर देण्याची नीती अवलंबिल्याने आलेले वैफल्यच अशा हल्ल्यांतून प्रकटू लागले आहे.