>> २१ जुलै रोजी एकमेव जागेसाठी मतदान
येत्या दि. २१ रोजी होणार्या राज्यसभा निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रदेश भाजपतर्फे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष तथा मावळते खासदार शांताराम नाईक यांनी अर्ज भरला.
तेंडुलकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा नगरविकासमंत्री विजय सरदेसाई, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर तसेच मगोचे साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री बाबू आजगावकर व आमदार दीपक पावसकर तसेच तीनही अपक्ष आमदार त्याचप्रमाणे भाजपचे मंत्री, आमदार मिळून एकूण १७ जणांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या आहेत. तर कॉंग्रेसचे उमेदवार शांताराम नाईक यांच्या अर्जावर पक्षाच्या चौदा आमदारांच्या सह्या आहेत. वरील आमदार अर्ज भरतेवेळी उमेदवाराबरोबर गेले होते.
उमेदवार म्हणून आपली निवड करण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारच्या घटक पक्षांकडे व अपक्ष आमदारांना विश्वासात घेतले होते. त्यांनी आपल्या उमेदवारीला जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला होता. मतदानाच्या वेळी सर्व आमदार व मंत्री आपल्या बाजूने मतदान करून देशसेवा करण्याची संधी देतील, अशी अपेक्षा व विश्वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला.
सर्वधर्मसमभावाचे तत्त्व मानणार्या सर्व आमदारांकडे आपण मते मागणार असल्याचे कॉंग्रेस उमेदवार शांताराम नाईक यांनी म्हटले आहे. सोमवारी रात्रीपर्यंत कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड, म. गो. व अपक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड चालविली होती. राज्यसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस कोणत्या उमेदवाराची निवड करतील यावर पर्रीकर सरकारचेही भवितव्य अवलंबून होते. परंतु अखेरपर्यंत सरदेसाई पर्रीकर यांच्या विरोधात भूमिका घेण्यास राजी झाले नाहीत. त्यामुळे सांताक्रुजचे माजी आमदार बाबूश मोन्सेर्रात सरदेसाई यांच्यावर नाराज झाल्याचे कळते.
राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी मोन्सेर्रात यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले होते. परंतु सध्या तरी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे सांगण्यात येते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोन्सेर्रात पणजीतून पोटनिवडणूक लढविण्याचे टाळतील, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.