विशेष संपादकीय

0
35

नवे चैतन्य, नवी ऊर्जा

प्रिय वाचक,
दैनिक नवप्रभा आज 53 वर्षांची वाटचाल आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करून 54 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनीच येणारा हा मंगलदिन दरवर्षी नवे चैतन्य घेऊन येत असतो व पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देत असतो. कोणत्याही वर्तमानपत्राचे जीवन म्हणजे खरे तर काळाशी लावलेली शर्यतच असते. त्याच्यासोबतच त्याची वाटचाल चाललेली असते. काळ बदलतो, सामाजिक मूल्ये बदलतात, समाज बदलतो, त्यानुसार पुढे जात असताना व कालसुसंगत राहतानाही आपली मूलभूत मूल्ये जपणे अतिशय महत्त्वाचे असते. आपली नवप्रभा आजवर हे करीत आली आहे आणि यापुढची तिची वाटचालही मूल्याधारित असेल असा सार्थ विश्वासही आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच तर एवढा प्रदीर्घ काळ आपण आमची साथसोबत करीत आलेला आहात व आपण यापुढेही ती करणार आहात याची आम्हालाही तितकीच खात्री आहे. भगभगते दिवे लवकर विझून जातात. नंदादीप मात्र शांतपणे अखंड तेवत असतो. तरीही तो भोवतीचा अंधार उजळवण्याचा प्रामाणिक प्रयास आपल्यापरीने करीत असतो. शिवाय त्यामध्ये सांस्कृतिक मांगल्यही सामावलेले असते. नवप्रभेनेही अशा नंदादीपाची नम्र भूमिका स्वीकारून ‘तमसोमा ज्योतिर्गमय’चे हे व्रत अखंड जोपासले आहे. मुक्त गोमंतकाच्या दैनंदिन स्पंदनांशी एकरूप होत आजवर येथील दीनदुबळ्यांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न आम्ही यथाशक्ती केला. जनतेचा आवाज बनलो. काय चूक आणि काय बरोबर हे दाखवण्यात कधी कसूर केली नाही. सामाजिक उन्मादासोबत वाहवत जाणे हे वर्तमानपत्राचे काम नव्हे, तर त्या उन्मादामागील हितसंबंध आणि स्वार्थ दाखवून देणेही गरजेचे असते. सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या चुका दाखवून देण्याची जबाबदारी जनतेच्या वतीने शिरावर घ्यावी लागते. धनदांडग्या मस्तवाल प्रवृत्तीशी दोन हात करायचीही कधी वेळ येते. या अशा प्रत्येक प्रकरणामध्ये नवप्रभेने स्वीकारलेली संपादकीय भूमिका ही नेहमीच वाचकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेली आहे याचा आम्हालाही आनंद आणि समाधान आहे. राजकारण आणि समाजकारणाला आजकाल समाजात अतोनात महत्त्व दिले जाते, परंतु खरे म्हणजे साहित्य, संस्कृती, संगीत, सर्जनशील कला असे विषय आपल्या जीवनाला अर्थपूर्णता देत असतात. माणसाचा जन्म हा सत्तेमागे किंवा पैशामागे धावण्यासाठी नाही. मानवी जीवनाला सांस्कृतिक किनार असायलाच हवी व ती तशी असेल तर ती जीवनाच्या सार्थकतेकडे घेऊन जाते ही आमची श्रद्धा आहे. त्यामुळे अशा विषयांना आम्ही नेहमीच अधिक आपुलकीने हाताळत असतो हेही आपल्या लक्षात आले असेलच.
संपूर्ण देशाप्रमाणेच आज गोव्यालाही चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयास सर्व धर्मांतील अतिरेकी घटक करू पाहत असल्याचे अलीकडे सतत प्रत्ययास येऊ लागले आहे. जातिधर्माच्या नावे समाजामध्ये कलह निर्माण करण्याच्या आणि त्याद्वारे येथील सामाजिक शांती, सलोखा आणि सौहार्द संपविण्याच्या उचापती चालल्या आहेत. अशावेळी लोकमतासोबत वाहवत न जाता विवेकाचा स्वर जागा ठेवण्याची नितांत आवश्यकता भासते आहे. नवप्रभेने हा विवेकाचा, सामंजस्याचा, संवादाचा स्वर सदैव स्वीकारलेला आहे. ‘वज्रादपि कठोरानि, मृदुनी कुसुमादपी’ अशी आमची भूमिका राहिली आहे. कोणाशी कसले लागेबांधे आणि कसले हितसंबंध नसल्याने आणि केवळ पत्रकारितेच्या उज्ज्वल वारशाशी निष्ठा वाहिलेली असल्याने जे योग्य वाटते व जे समाजहिताचे आहे ते स्पष्टपणे सांगण्यास आम्ही कधीही कचरलो नाही वा त्याच्या परिणामांची चिंताही केली नाही. आमचा वाचकही या वाटचालीत आमच्या सोबत राहिलेला आहे.
दरवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित विशेषांक आम्ही आपल्यापुढे प्रस्तुत करीत असतो. यंदाही असाच एक आगळावेगळा विषय आम्ही निवडलेला आहे. सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे होत आहेत. जगामध्ये उलथापालथ घडवून आणण्याची क्षमता असलेल्या काही गोष्टी सध्या पुढे आलेल्या आहेत. ह्या नवतंत्रज्ञानाच्या नव्या दिशा शोधण्याचा प्रयास यंदाच्या वर्धापनदिन विशेषांकातून आम्ही केला आहे. चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेटाव्हर्स वगैरे गोष्टींचा सध्या फार मोठा बोलबाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मानवी बुद्धिमत्तेच्या कैक पट संगणकीय बुद्धिमत्ता समोर आणलेली आहे आणि पुढे ती भस्मासुराप्रमाणे मानवावरच उलटणार नाही ना या चिंतेने जगाला वेढलेले आहे. चॅट जीपीटीसारख्या प्रणालीने तर सर्जनशीलतेलाही संगणकीय ज्ञानाच्या कवेत आणलेले आहे. मेटाव्हर्सचे आभासी मायाजाल आज मानवाला भोवतालच्या विश्वापेक्षा अधिक प्रिय व सुसह्य वाटू लागले आहे. ह्या सगळ्या नव्या तंत्रज्ञानांची माहिती सोप्या सरळ भाषेत आमच्या वाचकांना व्हावी, जगापुढे उभ्या असलेल्या नव्या आव्हानांची त्यातून कल्पना यावी यासाठी माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील काही मान्यवरांना आम्ही लेखनासाठी आमंत्रित केले आणि डॉ. अच्युत गोडबोले, अतुल कहाते, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. उदय निरगुडकर अशा या क्षेत्रातील दिग्गजांनी ह्या नवतंत्रज्ञानाच्या नव्या दिशांचा धांडोळा या पुरवणीत घेतला आहे. सायबरसुरक्षा, माहितीची सुरक्षा आज किती महत्त्वाची झाली आहे, या नव्या उभरत्या तंत्रज्ञानांचा मानवी रोजगारावर काय परिणाम संभवतो, त्यासाठी कोणते कायदेशीर प्रयत्न चालले आहेत अशा आनुषंगिक विषयांची चर्चाही यात करण्यात आली आहे. सायबरसुरक्षेत जगात आघाडीवर असलेल्या इस्रायलच्या प्रख्यात सायबरसिक्युरिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉय झूर यांचाही लेखनसहभाग लाभला आहे हे नमूद करायला हवे.
गोमंतकीय प्रादेशिकता जपत आणि त्याचवेळी राष्ट्रीय अस्मितेचा जागर करीत नवप्रभा यापुढची आपली वाटचाल करणार आहे. आपला वाचक हा सर्वार्थाने समृद्ध व्हावा ही आमची आस आहे आणि असा सुजाण, संवेदनशील, संस्कारशील आणि सुसंस्कृत वाचक आम्हाला लाभलेला आहे हा खरोखर आमच्या अभिमानाचा विषय आहे. आपली ही साथसोबत यापुढच्या काळातही अशीच राहावी. आमच्या लेखणीला आपण बळ द्यावे, आशीर्वाद द्यावेत ही नम्र कामना या शुभघडीस व्यक्त करतो. गोव्याच्या मुक्तिपूर्व काळातील एक अध्वर्यू आणि कवी कै. यशवंत सूर्यराव सरदेसाई तथा भाई देसाई यांनी तत्कालीन गोमंतकाला आपल्या कवितेतून आवाहन केले हेोते, जे आजही तितकेच लागू आहे. ते लिहितात –
‘पुराणप्रांता लवकर आता ऊठ महाभागा ।
आळस, निद्रा टाक, पुरा हो खडबडुनी जागा ॥
… नव्या दमाने ऊठ झडकरी, गमवुं नको वेळ ।
परंपरागत चैतन्याचा दावि जनां खेळ ॥
गोमंतकाचे हे अंगभूत चैतन्य या भूमीचे भाग्य आणि आपले सर्वांचे जीवन सदैव उजळवत राहो ह्या या शुभदिनी सदीच्छा!