तब्बल 137 दिवसानंतर अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पुनरागमन केले. सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर अखेर राहुल गांधीचे पाऊल पुन्हा संसदेत पडले. इतक्या दिवसानंतर ते संसदेत आले, तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत देखील करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी हजेरी लावली होतीच पण त्यांच्यासोबत इतर विरोधी पक्षांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे महम्मद फजल, डीएमकेचे तिरुची शिवा असे इंडिया आघाडीतील इतर खासदार स्वागतासाठी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालायने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालय किती वेगाने त्यांना खासदारकी बहाल करते, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. लोकसभा सचिवालयाने सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच अधिसूचना काढत राहुल गांधींचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले. मंगळवार दि. 8 ऑगस्टपासून लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. आता या प्रस्तावाच्या चर्चेवेळी राहुल गांधी काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.