सीबीआय तपासाची कॉंग्रेसचीही मागणी

0
146

गोव्यात विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांवर हल्ले करणार्‍या हल्लेखोरांना पकडण्यास गोवा पोलिसांना अपयश आलेले असून या पार्श्‍वभूमीवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिणार असल्याचे गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष व राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वरीलप्रश्‍नी काल नाईक यांनी पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांची भेट घेऊन राज्यात विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांवर होणार्‍या हल्ल्यांविषयी त्यांच्याकडे चिंता व्यक्त केली व हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी वरीलप्रश्‍नी नाईक यांनी चंदर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेला जाताना आपला ताबा कुणाकडे तरी द्यायला हवा होता. तो न देता अशा प्रकारे निघून जाणे हा बेजबाबदारपणा असल्याचे नाईक म्हणाले. गोव्यात जो धार्मिक सलोखा आहे त्याला सुरुंग लावण्यासाठीच हे हल्ले करण्यात येत असल्याचा आरोपही नाईक यांनी यावेळी केला. तसेच या हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.