नोंदणी न केल्यास हॉटेल्सची वीज, पाणी जोडणी तोडणार

0
29

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा इशारा

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील 43 टक्के उद्योग हे सरकार दरबारी नोंदणी न करता चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत केल्यानंतरही सरकार दरबारी नोंदणी न करणाऱ्या हॉटेल्ससह इतर उद्योग-व्यवसायांची वीज व पाणी जोडणी तोडण्यात येणार असल्याचा इशारा काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल गोवा विधानसभेत दिला.

हॉटेल्ससह विविध उद्योग सुरू करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया ही अत्यंत किचकट असल्याने या क्षेत्रातील व्यवसायिक हे सरकार दरबारी नोंदणी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून आल्याने आता पर्यटन खात्याने ही नोंदणी प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत केली आहे. त्यामुळे आता पर्यटन उद्योगातील व्यावसायिक मोठ्या संख्येने सरकार दरबारी नोंदणी करण्यासाठी पुढे येऊ लागले असल्याचे रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’चा अंगीकार पर्यटन खात्याने केल्याने आता पर्यटन क्षेत्रातील लोकांना त्याचा फायदा मिळू लागला असल्याचे खंवटे पुढे म्हणाले.

यावेळी यावरील चर्चेवेळी आमदार क्रूझ सिल्वा यांनी सरकार दरबारी नोंदणी न करता आपला व्यवसाय सुरू केलेले हॉटेलचालक व इतरांवर कारवाई न केल्याबद्दल पर्यटन खात्यावर टीकेचा हल्ला चढवला, तर आमदार विजय सरदेसाई यांनी नोंदणी न केलेल्या हॉटेल्स व पर्यटन क्षेत्रातील अन्य उद्योगांमुळे पर्यटन खात्याचा किती महसूल बुडाला याची माहिती खात्याकडे आहे का, असा प्रश्न केला. मात्र, त्यावर उत्तर देताना ती माहिती पुरवू शकेल अशी यंत्रणा खात्याकडे नसल्याची माहिती खंवटे यांनी दिली. यावेळी आमदार एल्टन डिकॉस्टा, जीत आरोलकर यांनीही विविध प्रश्न उपस्थित केले.