काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात ७ अमरनाथ यात्रेकरू ठार

0
95

>> अनंतनाग येथे बसवर हल्ला; १५ यात्रेकरू जखमी

जम्मू – काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरून परतणार्‍या बसवर काल रात्री साडेआठच्या दरम्यान दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १५ यात्रेकरू जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. अनंतनाग नजिक बेंटेगू येथे भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ला झालेल्या बसमधील भाविक गुजरातमधील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बालटल येथून मीर बाजार येथे जाण्यासाठी निघालेल्या बसमध्ये अठरा भाविक होते. बस बेंटेगू येथे पोचली असता दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात बसमधील दोन भाविक जागीच ठार झाले. तर अनंतनागच्या जिल्हा रुग्णालयात नेत असताना गंभीर जखमी झालेल्या चार जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या ४० आणि ९० या दोन बटालियनच्या जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
बसमधील भाविकांवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी खानबल येथील सुरक्षा दलांच्या तपासणी नाक्यावर रात्री सव्वाआठच्या दरम्यान हल्ला चढवला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर दहशतवाद्यांनी भाविकांना घेऊन जाणार्‍या बसला लक्ष्य केले. बसवर तुफान गोळीबार करत ते आरवनी भागात पळून गेले. जाता जाता त्यांनी जी ९० बटालियनच्या जवानांवर गोळीबार केला.ज्या भाविकांच्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसची नोंदणी नव्हती अशी माहिती समोर आली आहे. अमरनाथ यात्रेला जाणार्‍या भाविकांची तसेच बसची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या बसला सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे दहशतवाद्यांनी याच बसला लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे.