ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोडेस्वारी यांसारख्या खेळांवर 28 टक्के जीएसटी कर लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या मागील बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार असून, निर्णय लागू केल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 51 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत दिल्ली, गोवा आणि सिक्कीमने ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती, तर महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहारसह इतर राज्ये ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याच्या बाजूने आहेत, असे सीतारमन यांनी सांगितले. जीएसटी परिषदेने ऑनलाइन गेमिंगवर कर लावण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्त्यांवरही काल चर्चा केली.