अपघात टाळण्यासाठी तीन खात्यांचे संयुक्त प्रयत्न

0
53

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; सरकारचा केवळ दंडात्मक कारवाई भर : कामत यांचा आरोप

राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते व वाहतूक खाते या तीन खात्यांना एकत्र आणून वाढत्या रस्ता अपघातांवर उपाययोजना करण्याचे काम चालू आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेतून बोलताना दिली. काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील वाढत्या रस्ता अपघातांचा प्रश्न उपस्थित केला होता.

राज्य सरकारने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात दंड देणे, अपघातांना जबाबदार असलेल्या वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करणे आदी गोष्टींवर फार भर दिलेला आहे, असा आरोप करुन त्याऐवजी रस्ता अपघात कसे टाळता येतील, यावर सरकारने भर देण्याची गरज असल्याचे कामत यांनी सांगितले.

डॉ. पाशारिचा नामक एका तज्ज्ञ व्यक्तीने ‘रोड इंजिनिअरिंग’संबंधी राज्य सरकारला काही सूचना करणारा एक अहवाल सादर केला होता. वाहतूक व्यवस्थापनातील ते एक तज्ज्ञ होते. त्यांनी सादर केलेला अहवाल मिळवून त्यातील सूचनांची सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी देखील कामत यांनी केली. यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अहवाल मिळवून त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मद्यधुंद स्थितीत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच व्हेन्झी व्हिएगस, विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्टा आदींनीही महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.