ईदसाठी घरी आलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण

0
23

भारतीय लष्करातील जवान जावेद अहमद वानी हा ईदनिमित्त जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आपल्या घरी गेला असता त्याचे अपहरण करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून जावेद बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्याची पोस्टींग लेह लडाखमध्ये होती. परंतु ईद साजरी करण्यासाठी तो सुट्टी घेऊन घरी आला होता. ज्या गाडीतून संबंधित जवान घरून निघाले होते ती गाडीही नातेवाइकांना मिळाली आहे. यासंबंधीचे शोधकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय जावेद अहमद वानी हा भारतीय लष्कराचा शिपाई लेहमध्ये तैनात आहेत. शनिवारी रात्री आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला. याचबरोबर सायंकाळी परन्हाळ येथे त्याची कार सापडली असून वानी हा कुलगाममधील अचथल भागातील रहिवासी आहे.

अपहरणाची माहिती मिळताच लष्कराने मोठ्या प्रमाणात जवानाचा तपास करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानी घरासाठी किराणा सामान घेण्यासाठी आपल्या अल्टो कारमधून चौलगामला गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या गावांत त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान त्याची कार परनाळजवळ आढळून आली. गाडीला कुलूप नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. कारमध्ये वानीची चप्पल आणि रक्ताच्या खुणाही आढळून आल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली.

जम्मू काश्मीरमध्ये सैन्यातील जवानाच्या अपहरणाचे यापूर्वीही अनेक प्रकार घडले आहेत. 2017 मध्येही असाच प्रकार घडला. ज्यात सुट्टीसाठी घरी आलेल्या सैन्यातील युवा अधिकाऱ्याचे शोपिया जिल्ह्यातील दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृतदेहाचे पोस्टमोर्टम केल्यानंतर खूप जवळून युवकाला गोळ्या मारल्या होत्या. त्याच्या डोक्यात, पोटात आणि छातीत गोळ्या होत्या असे निदर्शनास आले.