दोन महिन्यांची बंदी आज संपणार
गेल्या 1 जूनपासून राज्यात लागू झालेली मच्छिमारी बंदी उद्या 1 ऑगस्टपासून संपुष्टात येणार असून राज्यात मच्छिमारी मोसम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मच्छिमारी खात्याने मच्छिमारीसाठीची सगळी तयारी पूर्ण केली असल्याचे काल मच्छिमारी खात्यातील सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.
आज सोमवारी संध्याकाळी राज्यातील सर्व जेटींना लावण्यात आलेले सील उघडून या जेटी मच्छिमारीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. तसेच मच्छिमारी जेटींवरील डिझेल पंपही सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील 61 दिवसांची मच्छिमारी बंदी संपून उद्यापासून मच्छिमारी मोसम सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारी ट्रॉलर्स व अन्य छोट्या बोटींवर मच्छिमारीचे काम करणारे परप्रांतातील कामगारही गोव्याकडे परत येऊ लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात ओरिसा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आदी विविध राज्यांतील कामगारांचा समावेश आहे.
राज्यात नोंदणीकृत सुमारे 1200 मच्छिमारी ट्रॉलर्स असून अन्य सुमारे 700 ते 800 बोटी असल्याचे मच्छिमारी खात्यातील सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
दक्षिण गोव्यातील सर्वांत मोठी मच्छिमारी जेटी म्हणजे कुटबण जेटी (सासष्टी), वास्को जेटी (मुरगाव), तळपण जेटी (काणकोण), मालिम जेटी, शापोरा जेटी (बार्देश) ह्या राज्यातील काही प्रमुख जेटी आहेत. या सर्व जेटी तसेच अन्य छोट्या मोठ्या जेटीही उद्यापासून सुरू होणार असलेल्या मच्छिमारी मोसमासाठी सज्ज झालेल्या आहेत.