गोवा चॅलेंजर्सने जिंकली अल्टिमेट टेबल टेनिस लीग

0
21

महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या चौथ्या मोसमात गोवा चॅलेंजर्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात गोवा संघाने गतविजेत्या चेन्नई लायन्स संघाचा 8-7 असा पराभव केला. हरमीत देसाई आणि अल्वारो रॉबल्स यांनी गोव्याच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले. गोवा फ्रँचायझीचे हे पहिलेच विजेतेपद आहे. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल विजेत्या संघाला 75 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

भारताचा पुरुष एकेरीतील आघाडीचा खेळाडू हरमीत देसाईने या अंतिम लढतीत अनुभवी बेनेडिक्ट डुडाचा 2-1 असा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला चांगली सुरुवात करून दिली. आतापर्यंत लीगमध्ये अपराजित राहिलेल्या जागतिक क्रमवारीत 32व्या स्थानावर असलेल्या डुडाने सामन्याची दमदार सुरुवात करत दोन्ही बाजूंनी जोरदार फटके मारत आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी पहिला गेम 11-6 असा जिंकला पण हरमीत देसाईने शानदार पुनरागमन करत दुसरा गेम 11-4 असा जिंकत सामना निर्णायक गेममध्ये ढकलला. थरारक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. शेवटी हरमीतने संयम राखत हा गेम 11-8 असा जिंकत सामना जिंकला. मात्र या वर्षी लीगमध्ये 200 पेक्षा जास्त गुण मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरलेल्या यांगझी लियूने आपली अपराजित मालिका कायम राखत सुथासिनी सविताबूटला 2-1 असे पराभूत करत चेन्नईला 3-3 असे बरोबरीत आणले.

मिश्र दुहेरीत झालेल्या तिसऱ्या लढतीत चेन्नईच्या अचंता शरथ कमल आणि यांगझी जोडीने हरमीत आणि सुथासिनी जोडीचा 2-1 असा पराभव केला. यासह चेन्नई लायन्सने सामन्यात 5-4 अशी आघाडी घेतली. चेन्नई लायन्सच्या जोडीने पहिल्या गेममध्ये उत्तम समन्वय दाखवत 11-7 असा विजय मिळवला तर दुसरा गेम 11-9 असा जिंकला. हरमीत आणि सुथासिनी जोडीने मात्र तिसरा गेम गोल्डन पॉईंटच्या माध्यमातून जिंकला.
चौथ्या लढतीसाठी भारताचा अनुभवी खेळाडू अचंता शरथ कमत व व गोवा संघाचा कर्णधार अल्वारो रॉबल्स यांच्यात सामना झाला. हा सामना गोवा संघासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. रॉबल्सने या सामन्यात 11-8, 11-8, 11-10 अशी बाजी मारत गोवा संघाला 7-5 अशी दोन गुणांची आघाडी मिळवून दिली.

निर्णायक सामन्यात चेन्नईच्या सुतिर्था मुखर्जीने पहिले गेम 11-7 असा सहज जिंकला. यामुळे चेन्नईने पिछाडी 6-7 अशी कमी केली. दुसऱ्या गेममध्ये गोवा संघाच्या रिथ रिष्या टेनिसन हिने विजयाच्या स्थितीत असताना टाळता येण्यासारख्या चुका करत चेन्नईला 7-7 अशी बरोबरीची संधी दिली. शेवटच्या गेममध्ये रिथने 11-6 असा एकतर्फी विजय मिळवत गोवा संघाला विजेतेपद मिळवून दिले. हा सामना पाहण्यासाठी गोवा चॅलेंजर्सचे मालक श्रीनिवास धेंपो, सौ. पल्लवी धेंपो खास उपस्थित होते.