>> एक स्वदेशी तर सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश
अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) काल रविवारी 30 जुलै रोजी एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी-56 या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 6.30 वाजता या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. चांद्रयान -3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर इस्रोची ही आणखी एक यशस्वी कामगिरी आहे.
सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे आपले सहा उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोकडे मदत मागितली होती. त्यानुसार इस्रोच्या पीएसएलव्ही-सी-56 रॉकेटद्वारे या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
तिसरी व्यावसायिक मोहीम
भारतीय अंतराळ संस्थेची या वर्षातील ही तिसरी व्यावसायिक मोहीम आहे. इस्रोने यापूर्वी मार्चमध्ये एलव्हीएम-3 रॉकेटसह ब्रिटनच्या वन-वेव्हशी संबंधित 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते. यानंतर एप्रिलमध्ये पीएसएलव्ही रॉकेटमधून सिंगापूरचे 2 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. त्यानंतर काल रविवारी तिसरी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर हा उपग्रह आता सिंगापूरच्या विविध संस्थांच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.