मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल

0
12

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव लोकसभेत काल दाखल केला. हा ठराव मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास ठरावलोकसभा अध्यक्षांनी चर्चेसाठी मंजूर केला. या अविश्वास ठरावावर चर्चेची वेळ आणि तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे.

काँग्रेसने दिलेल्या या नोटीशीनंतर आता लवकरच सभागृहात त्यावर चर्चा होऊन मतदान पार पडेल. मोदी सरकारकडे 332 चे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही; पण तरी देखील सभागृहातल्या चर्चेला मात्र सरकारला अखेर सामोरे जावे लागणार आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्याने या अविश्वास ठरावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांनी आखली आहे. काल लोकसभा अध्यक्षांनी ही नोटीस पटलावर दाखल करुन घेतली. लवकरच त्या चर्चेसाठी तारीख वेळ निश्चित केली जाईल.
मणिपूरच्या मुद्द्यावर गेल्या चार-पाच दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरू आहे. विरोधक पंतप्रधानांच्याच उत्तरासाठी आग्रही आहेत. आता अविश्वास ठरावावर पंतप्रधानांना उत्तर द्यावेच लागणार असून, त्यावेळी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांचा असणार आहे.