येत्या हंगामात खाण व्यवसाय सुरू होणार

0
10

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; परराज्यातील यंत्रसामुग्री, कामगारांना मनाई करणार

राज्यातील खाण व्यवसाय येत्या हंगामात सुरू होणार आहे. या खाणींवर राज्यातील कामगार, यंत्रसामुग्री, टिप्पर ट्रक यांना काम मिळवून दिले जाणार आहे. खाणीसाठी परराज्यातील यंत्रसामुग्री, कामगार आणण्यास मान्यता दिली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत खाण, वित्त, अबकारी व इतर खात्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

खाणींविषयीचा प्रश्न काल युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी मांडला होता. राज्यातील आत्तापर्यंत 9 खाणपट्ट्यांच्या लिलावातून 45 कोटी रुपये मिळाले आहेत. लिलाव केलेला एक खाणपट्टा सुरू झाला, तरी त्या खाण कंपनीला 300 ते 350 कोटी भरावे लागणार आहेत. खनिज डंप धोरण येत्या ऑगस्ट महिन्यात जारी केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य सरकार दाबोळी विमानतळाच्या विषयावर गंभीर आहे. विधानसभा अधिवेशनानंतर राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ दाबोळी विमानतळाचा प्रश्न मांडण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांची भेट घेणार आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीकडून येत्या 31 मार्च 2024 नंतर 37.8 टक्के महसूल प्राप्त होण्यास प्रारंभ होणार आहे. अबकारी महसुलात 33.16 टक्के वाढ झाली आहे. राज्य सरकारकडून फेणीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील लेखा भवनाचे उद्घाटन येत्या 2 ते 3 महिन्यांत केले जाणार आहे. लेखा खात्याने ई-पेमेंट सुविधा सुरू केली आहे. वित्त खात्याकडून कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन वेळेवर उपलब्ध करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यावर विचार केला जात आहे. महसूल वाढविण्यावर भर दिला जात आहे. कर चुकवेगिरी शोधून काढली जात आहे. वित्त खात्याकडून 30 दिवसांत फाईलवर निर्णय घेतला जातो. फाईल प्रलंबित ठेवल्या जात नाहीत. केवळ स्पष्टीकरणासाठी काही फाईल संबंधित खात्याकडे परत पाठविल्या जातात. त्यामुळे काही दिवस निर्णय घेण्यात विलंब होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अबकारी घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी सुरू
पेडणे अबकारी कार्यालयातील मद्य परवाना नूतनीकरण घोटाळ्यामध्ये 27 लाख रुपये वसूल केले आहे. तसेच, तिघांना निलंबित केले असून, दक्षता खात्याकडून चौकशी केली जात आहे. पेडणे अबकारी कार्यालयात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालेला नाही. अबकारी कार्यालयातील घोटाळा प्रकरणी लेखा अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.