मोदी सरकारविरोधात विरोधक अविश्वास ठराव मांडणार

0
8

>> मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत विरोधकांचा निर्णय

मणिपूरमधील हिंसाचार तसेच या राज्यातील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून, त्याचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर निवेदन मांडत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांची ही मागणी मान्य करण्यास भाजपा तयार नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोठा निर्णय घेतला असून, विरोधक लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडणार आहेत.

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासून मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संसदेतील दालनात विरोधकांची काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण लोकसभेत मोदी यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे; मात्र अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर विरोधक तसेच सत्ताधऱ्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागते. यानिमित्ताने मोदी हे मणिपूर हिंसाचारावर बोलतील आणि त्यांना कोंडीत पकडता येईल, अशी विरोधकांची भूमिका आहे.

ईस्ट इंडिया कंपनीमध्येही ‘इंडिया’ : मोदी

भाजपने देखील काल संसदेत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आगामी काळात अधिवेशनात काय रणनीती आखावी, काय भूमिका घ्यावी यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीच्या नव्या नावावर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला. केवळ इंडिया नाव ठेवल्याने काही फरक पडणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही इंडिया नाव लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही इंडिया आहे. तसेच विरोधक विखुरलेले आहेत आणि हताश झाले आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

खर्गे यांचा मोदींच्या विधानाला आक्षेप
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. आम्ही मणिपूरबद्दल बोलत आहोत आणि पंतप्रधान भारताची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत आहेत. अरे, तुम्ही मणिपूरविषयी बोला ना, असे खर्गे म्हणाले.