>> विधानसभेत विरोधकांची जोरदार मागणी
>> आतापर्यंत 33 टक्के काम पूर्ण ः मुख्यमंत्री
पणजी स्मार्ट सिटीच्या कामात करोडो रु. चा घोटाळा झालेला असून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी काल विरोधकांनी गोवा विधानसभेत केली. काल प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी पणजी स्मार्ट सिटीसंबंधीचा प्रश्न विचारला होता.
यावेळी विरोधकानी पणजी स्मार्टसिटीवर खर्च करण्यात आलेल्या करोडो रुपयांत मोठा घोटाळा झाल्याच्या आरोप करीत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी बोलतानार डिकॉस्टा यांनी, पणजी स्मार्ट सिटीसाठी 980 कोटी रु. मंजूर झालेले असून त्यापैकी 490 कोटी रु. हे केंद्रातून मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 537.86 कोटी रु. आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. एवढे पैसे खर्च केले पण शहरात काही चांगले काम झाले असल्याचे दिसत नाही. उलट सर्वत्र खोदकाम करुन तोडफोड केल्याचे चित्रच दिसत असल्याचा आरोप डिकॉस्टा यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी, स्मार्टसिटीचे काम सुरू झाल्यापासून पणजी शहरातील रस्ते खचू लागले आहेत. वाहनांची चाके या खचलेल्या रस्त्यात रुतू लागली आहे. शिवाय पावसाळ्यात पणजी शहरात पूर येऊ लागलेला आहे. ही वस्तुस्थिती असून ती मुख्यमंत्र्यांनाही मान्य करावी लागेल, असे आलेमांव म्हणाले. पणजी शहरात यापुढे पूर येणार नाही असा सरकारने केलेला दावा खोटा ठरला असल्याचेही आलेमांव यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. जुन्या सचिवालयाच्या वास्तूचे नुतनीकरण करताना तिचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले होते काय, असा सवालही त्यांनी केला.
स्मार्टसिटीचे 33 टक्के काम पूर्ण ः मुख्यमंत्री
यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, पणजी स्मार्ट सिटीचे आतापर्यंत फक्त 33 टक्के एवढेच काम पूर्ण झालेले आहे. स्मार्टसिटीचे सगळे काम पूर्ण झाल्यानंतर पणजी शहराला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी स्मार्टसिटीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच स्मार्टसिटीला नावे ठेवू नयेत.
या 33 टक्के कामावर 335 कोटी रु. एवढा खर्च करण्यात आला असल्याची माहितीही यावेळी सावंत यांनी दिली.
आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळी बोलताना पणजी स्मार्टसिटी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी केली. स्मार्टसिटीच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्यांवर काय कारवाई केली आहे, असा प्रश्न यावेळी युरी आलेमांव यांनी केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की पण्ाजी स्मार्टसिटीच्या यापूर्वीच्या सीईओवर दक्षता खाते व पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. त्यांना कामावरुनही काढून टाकण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आता स्मार्टसिटीच्या कामाला वेग आलेला असून ध्यान सेतू, योग सेतू आदीचे काम पूर्ण झाले असून हे या सुंदर कामाची दखल घेतली जाऊ लागली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.
स्मार्टसिटीचे काम करताना पण्ाजीतील भूमिगत वीज वाहिन्या कंत्राटदारांनी खराब करुन टाकल्या असून त्यामुळे करोडो रु. चे नुकसान झाले असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. त्याशिवाय कंत्राटदारांची केलेल्या कामांमुळे शहरातील रस्तेही खचू लागले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.
त्यावर बोलताना या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले. स्मार्टसिटीचे काम 2016 साली सुरू झाले होते. ऑक्टोबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. स्मार्टसिटीचे काम वेगवेगळ्या 6 एजन्सींना देण्यात आलेले असून पणजी स्मार्टसिटीवर 950 कोटी रु. खर्च करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.