गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने धारबांदोडा येथे एका मारुती व्हॅनची झडती घेऊन 1200 जिलेटिनच्या कांड्या आणि 300 डेटोनेटर्स बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून मारुती व्हॅन व इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, दगड खाणीच्या कामासाठी विनापरवाना जिलेटिन आणि डेटोनेटर्स आणल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी तालक (35) आणि भुजंग उर्फ बाळा खटावकर (32) या दोघांना अटक केली आहे. दोघेही गुड्डेमळ सावर्डे येथील रहिवासी आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धारबांदोडा येथील सावर्डे जंक्शनजवळ मारुती व्हॅन अडविली. या व्हॅनची झडती घेतली असता त्यात 1200 जिलेटिनच्या कांड्या आणि 300 इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर्स असलेले सहा बॉक्स सापडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर रामानन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.