कला अकादमीवरून ‘गदारोळ नाट्य’

0
8

विधानसभेत चर्चेसाठी विरोधक आग्रही; प्रश्नोत्तराचा तास वाया; नूतनीकरणात भ्रष्टाचाराचा आरोप

कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत रविवारी मध्यरात्री कोसळण्याची जी घटना घडली होती, त्याचे पडसाद काल गोवा विधानसभेत उमटले. काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्र सुरू होताच कला अकादमीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी त्वरित चर्चेची मागणी करत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत एकच गदारोळ माजवला. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार चालू असून, त्यामुळेच हे छत कोसळले असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला.

काल सभागृहाचे कामकाज सुरू होताच गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे प्रश्नोत्तराचा तास रद्द करावा आणि कला अकादमीच्या मुद्द्यावर चर्चेस वेळ द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली. या मुद्द्यावरून आपण स्थगन प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास रद्द केला जावा व त्याऐवजी कला अकादमीच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, कु्रझ सिल्वा, आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी याच मागणीसाठी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री, सभापतींची शिष्टाई अयशस्वी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न करताना प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आपण कला अकादमीविषयीची माहिती सभागृहाला देतो, असे सांगितले; मात्र विरोधकांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळताना सदर प्रश्नी आम्हाला आताच चर्चा हवी आहे आणि प्रश्नोत्तराचा तास रद्द करून ती घडवून आणली जावी, असा आग्रह धरला. यावेळी सभापती रमेश तवडकर यांनीही विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करताना प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले; पण त्यांचाही प्रस्ताव विरोधकांनी फेटाळला.

पुन्हा विरोधकांचा गदारोळ
यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करून आमदार एल्टन डिकॉस्टा यांना त्यांचा तारांकित प्रश्न मांडण्याचा आदेश दिला. डिकॉस्टा यांनी आपला प्रश्न मांडला; पण विरोधी आमदारांनी गदारोळ माजवल्याने सदर प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे सभापतींनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले असता पुन्हा एकदा विरोधकांनी गदारोळ
माजवला.

आत्ताच चर्चा हवी : सरदेसाई
कला अकादमीच्या रंगमंचाचे छत कोसळणे हा विषय हा गंभीर आहे. नूतनीकरण कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारामुळे एक वारसा इमारत कोसळली आहे. त्यामुळे या विषयावर आत्ताच चर्चा व्हायला हवी, अशी मागणी यावेळी विजय सरदेसाई यांनी लावून धरली. त्यावर सभापतींनी हे अधिवेशन आणखी बरेच दिवस चालणार असून चर्चेसाठी खूप वेळ मिळणार असल्याचे सांगत सरदेसाई यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो असफल ठरला. या गदारोळामुळे काल प्रश्नोत्तराच्या तासाला एकाही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही.

विरोधकांकडून घोषणाबाजी अन्‌‍ झळकावले फलक
सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतलेल्या विरोधी आमदारांनी घोषणाबाजी तर केलीच, शिवाय कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात घोटाळा झाला आहे, असे लिहिलेले फलक देखील त्यांनी झळकावले.

कुणाचीही गय करणार नाही : मुख्यमंत्री

कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्याची जी घटना घडली त्या घटनेचा संपूर्ण अभ्यास आणि कोसळलेल्या छताची पाहणी करून विनाविलंब त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी आयआयटी रुरकीवर सोपवण्यात आली आहे. आयआयटी रुरकीच्या सिव्हिल इंजिनियरला त्यासंबंधीचे पत्र पाठवण्यात आले आहे. या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार असून, त्याला जे कोण जबाबदार असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिले.
काल या प्रश्नावरून विरोधी आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी गदारोळ माजवून कामकाज बंद पाडले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ज्या कुणाच्या या दुर्घटनेत हात असेल त्यापैकी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याचा अहवाल हा विनाविलंब म्हणजेच पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच मिळवण्यात येणार असून तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.