मोदींविरोधात विरोधकांची ‘इंडिया’

0
9

अखेर एकजूट झालीच; बंगळुरूतील बैठकीला 26 पक्षांची हजेरी

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील 26 विरोधी पक्ष एकत्र आले असून, या पक्षांची संयुक्त बैठक काल बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच जागा वाटप आणि इतर मुद्यांवर सर्व सहमतीसाठी 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे.

ही बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांच्या आघाडीचे नाव जाहीर केले.

विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता 26 पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या बैठकीत 20 पक्ष आले होते. पाटणा येथे येणे काही पक्षाच्या नेत्यांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे तेव्हा तिथे तुम्हाला कमी पक्ष दिसले; परंतु आता आम्ही 26 पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे धाबे दणाणले आहेत. आमची 26 पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली आहे. त्यात त्यांनी 38 पक्षांना बोलावले आहे. हे 38 पक्ष कुठले आहेत, तेच माहिती नाही. हे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत की नाही तेसुद्धा कोणाला माहिती नाही. या पक्षांची नावेही कधी ऐकलेली नाहीत, असा टोला खर्गे यांनी लगावला.

‘नकारात्मक आघाडी’ यशस्वी होणार नाही : मोदी
नवी दिल्ली : दिल्लीत काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी असलेल्या 38 पक्षांची बैठक झाली. एनडीएची 25 वर्षे आणि केंद्र सरकारची 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले, त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या आघाडीवर खोचक टीका केली. देशाला राजकीय आघाड्यांचा मोठा इतिहास आहे; पण नकारात्मक विचारांनी केलेल्या आघाड्या यशस्वी झालेल्या नाहीत. सत्ता मिळवणे हे एनडीएचे ध्येय नव्हते. एनडीए कोणाच्या विरोधात स्थापन झालेला नाही. देशात स्थिरता आणण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली, असे मोदी म्हणाले.