राज्यसभा खासदार म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या काल जाहीर करण्यात आले. गोवा विधानसभेच्या सचिव तथा राज्यसभा निवडणूक अधिकारी नम्रता उल्मान यांनी बिनविरोध निवडीचे पत्र सदानंद शेट तानावडे यांना प्रदान केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि भाजप नेते उपस्थित होते.
गोव्यातील राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ या महिन्यात पूर्ण होत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी सदानंद तानावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. राज्यातील विरोधी आमदारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे राज्यसभा खासदारपदी तानावडे यांची बिनविरोध निश्चित झाली होती. राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आलेले तानावडे हे पहिले खासदार ठरले आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांनी तानावडे यांचे अभिनंदन केले आहे.