अर्थसंकल्प निव्वळ आकड्यांचा खेळ

0
6

>> आमदार विजय सरदेसाई यांची टीका

राज्याचा वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प हा निव्वळ आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी बोलताना काल केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गत 2022-23 च्या अर्थसंकल्पात 170 घोषणा केल्या होत्या. त्यातील 58 घोषणा म्हणजेच केवळ 34 टक्के घोषणांची पूर्तता करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहे. राज्यातील खाण व्यवसाय येत्या हंगामात सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आर्थिक तूट भरून येणे कठीण आहे, असा दावा आमदार सरदेसाई यांनी केला.

राज्याच्या पर्यटन विकासासाठी योग्य धोरण तयार करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांच्यात पर्यटनाच्या विकासाबाबत एकवाक्यता नाही, अशी टीका आमदार सरदेसाई यांनी केली.
राज्य सरकार एका बाजूने स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देत आहे. तर, दुसऱ्या बाजूने राज्यातील महिला गटांकडे असलेले मध्यान्ह आहार वितरणाचे काम काढून घेऊन परराज्यातील कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे.

राज्यात शीतगृहाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत गेली वर्षे घोषणा केली जात आहे. तथापि, अजूनपर्यंत शीतगृहाची सुविधा उपलब्ध झालेली नाही.

पणजी शहराच्या तुलनेत मडगावची स्थिती चांगली
पणजीचा स्मार्ट सिटी म्हणून विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. तरीही पावसाळ्यात पणजी पाण्याखाली जात आहे. पणजी ही स्मार्ट नव्हे तर ‘स्टुपीड’ सिटी बनली आहे. पणजी महानगरपालिकेसह ट्रिपल इंजीन सरकार असताना पणजी पाण्याखाली जात आहे. पणजीच्या तुलनेत मडगावची स्थिती थोडी चांगली आहे. कारण, मडगावला स्मार्ट करायचे ठरवलेले नाही. आम्हांला देव पावला, असा टोला आमदार सरदेसाई यांनी हाणला.