‘आरोग्य म्हणजे संपत्ती’ हे केवळ शब्द नाहीत तर जीवन जगण्याचे मूळ आहे. कारण जोपर्यंत आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी नसतो, तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आजच्या काळात उत्तम आरोग्य ही प्रत्येकाचीच गरज आहे.
उत्तम आरोग्य म्हणजे एक सुखी-स्वास्थ्य जीवनाचा सकारात्मक पैलू. जिथं आपलं मन व शरीर एकमेकांशी सुसंवाद साधून आपल्या शरीराचं योग्य, सुचारू पद्धतीनं संतुलन साधत आपल्याला निरोगी ठेवतं. शरीराचे सर्वच अवयव अगदी समान्यपणे काम करतात, दैनंदिन हालचाली सहजरीत्या होतात अशी शारीरिक व मानसिक अवस्था म्हणजे आरोग्य.
अस म्हटलं जातं की मनुष्य तेव्हाच निरोगी असतो जेव्हा त्याचं मन व शरीर सुदृढ असतील. निरोगी, सुदृढ आरोग्य माणसाला दीर्घायुषी बनवतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी किंवा आजारमुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व सामाजिकदृष्ट्या सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य.
समजा एखाद्या व्यक्तीचं शरीर व्याधीमुक्त आहे, त्याला कोणताही आजार नाही; परंतु तो सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो, एखादा कायमस्वरूपी रागीट, आदळआपट करणारा, लालची किंवा लोभी असतो अशा व्यक्तीला निरोगी म्हणता येणार नाही. आपल्याला जर आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही तितकाच भर दिला पाहिजे.
आरोग्याचे वेगवेगळे चार प्रकार आहेत. मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य, शारीरिक आरोग्य. मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताणतणाव, चिंता, नकारात्मक विचारसरणीला आपल्या मनात स्थान नसेल. भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलित स्थिती जिथे राग, लोभ, अहंकार व तिरस्काराला आपल्या जीवनात स्थान नसेल. एकात्मता आणि सुसंवादाने राहणे म्हणजेच आध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीरीतींवर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरांचा आदर करणे म्हणजे आध्यात्मिक आरोग्य. जेव्हा आपलं शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधीपासून व शारीरिक इजा व अनियमिततेपासून मुक्त असते अशा स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हटले जाते.
असे म्हणतात की, मन निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते. परंतु सध्याचा काळ हा अतिशय व्यस्त आणि धावपळीच्या जीवनाचा आहे. आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात कामाची व्यस्तता आणि ताणतणाव सतत वाढत आहेत. त्यामुळे आजच्या काळात जर आपल्याला निरोगी मन हवे असेल तर सर्वप्रथम आपण आपले शरीर निरोगी बनवण्यावर भर दिला पाहिजे.
‘आधी आरोग्य’ म्हणजे शरीराची चांगली कार्य करण्याची क्षमता असे म्हटले जाते; मात्र काळ जसजसा विकसित होत गेला तसतशी आरोग्याची व्याख्याही विकसित होत गेली.
सध्याच्या काळात आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. कारण आज आपल्या देशात ज्या वेगाने सर्वप्रकारचे प्रदूषण वाढत आहे, त्याच वेगाने अनेक प्रकारचे आजारही वाढू लागले आहेत. त्यामुळे शरीराचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे. नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे. दुसरे म्हणजे, आपण दररोज व्यायाम करणेही आवश्यक आहे. हे तुमच्या शरीराला शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत करेल. शिवाय जंक फूड सतत खाऊ नका. धूम्रपान किंवा मद्यपान करू नका, कारण त्याचे गंभीर परिणाम पुढे दिसून येतील. शिवाय पुरेशी झोपही घेतली पाहिजे. मानसिक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती होय. एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य त्याच्या भावनांवर आणि परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर परिणाम करते. आपण सकारात्मक राहून आणि ध्यान करून आपले मानसिक आरोग्य राखले पाहिजे.
कोणत्याही व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणासाठी सामाजिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांशी प्रभावीपणे संवाद साधते, तेव्हा ती सामाजिक आरोग्य राखू शकते. शिवाय, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी मैत्रीपूर्ण असते आणि सामाजिक संमेलनांना उपस्थित राहते, तेव्हा त्याचे सामाजिक आरोग्य नक्कीच चांगले असते.
ज्या व्यक्तीचे शरीर आणि मन निरोगी असते, त्याच्याकडेच जगातील खरी संपत्ती असते. जर तुमच्याकडे भरपूर पैसा आणि भरपूर वेळ असेल, पण ही संपत्ती आणि वेळ खर्च करण्यासाठी तुमच्याकडे निरोगी शरीर नसेल तर ते कसे होईल?
वर्तमानात आपण सर्व आपापल्या कामात इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला आयुष्याचा पुरेपूर आनंद घेताच येत नाही. कारण माणूस आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे तो त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही की शरीर निरोगी बनवण्याकडे लक्ष देत नाही. आजकालच्या जीवनशैलीत बरेच लोक फास्ट फूडचे सेवन करतात, त्यामुळे अनेक आजार जसे की लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब होण्याचा धोका असतो. तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ शकता.
‘आरोग्य म्हणजे संपत्ती’ हे केवळ शब्द नाहीत तर जीवन जगण्याचे मूळ आहे. कारण जोपर्यंत आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी नसतो, तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आजच्या काळात उत्तम आरोग्य ही प्रत्येकाचीच गरज आहे.