कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळले

0
11

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; संबंधित मंत्र्यांचे स्पष्टीकरण; विरोधकांचे टीकास्त्र; मुख्य सचिवांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश

कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत रविवारी मध्यरात्री अचानक कोसळले. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली. कला अकादमीच्या मुख्य इमारतीचे दुरुस्तीकाम गेल्या सुमारे दोन वर्षांपासून चालू असून, ते कामही या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत राहिले आहे. हे छत कसे कोसळले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमी परिसरात जाऊन कोसळलेल्या छताची पाहणी केली. या घटनेबाबत साबांखा व कला-संस्कृती मंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मात्र सरकारवर टीकास्त्र चालवले आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून मंगळवारपर्यंत अहवाल सादर करावा, असा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला काल दिला. तसेच कंत्राटदार ‘टेकटॉन’ कंपनीला नोटीस जारी करून त्यांना मंगळवारपर्यंत स्पष्टीकरण देण्यास बजावले आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्याचा प्रकार घडला. रात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, रंगमंचावरील अनेक पुरातन व दर्जेदार प्राचीन स्वरूपातील साहित्याची हानी झाली आहे.

श्वेतपत्रिका काढणार : काब्राल
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम चालू असून, सदर घटनेनंतर साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी कोसळलेल्या छताची पाहणी केली. तसेच या खुल्या रंगमंचाचे जे छत कोसळले आहे, त्याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनीही दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कला अकादमीच्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे काम करणारा कंत्राटदार सदर दुर्घटनेला जबाबदार आहे की, त्यांनी ह्या जुन्या वास्तूवर जास्त भार टाकल्याने त्याचे छत कोसळले, याचा अभ्यास करून त्यावषयीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

कोसळलेले छत हे नूतनीकरण
सुरू असलेल्या इमारतीचे नाही

कोसळलेले छत हे खुल्या रंगमंचाचे असून, त्या इमारतीचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आलेले नाही, असा खुलासा कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल केला. आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आम्ही यासंबंधीचा अहवाल मागितला आहे, तो हाती आला की सर्व काही स्पष्ट होणार असल्याचे गावडे म्हणाले. जे छत कोसळले आहे, तो सुमारे 40 ते 43 वर्षांपूर्वीचे असून, त्याचे कधीही नूतनीकरण किंवा दुरुस्ती करण्यात आली नव्हती, असेही गावडे यांनी स्पष्ट केले.

आयआयटी, एनआयटीद्वारे कारण शोधून काढा
पणजी (प्रतिनिधी) : कला अकादमीच्या खुल्या नाट्यगृहाच्या कोसळलेल्या छताबाबत आयआयटी रुरकी, किंवा इतर कुठल्याही आयआयटी किंवा एनआयटीच्या माध्यमातून स्वतंत्र चौकशी करून घटनेचे कारण शोधून काढावे, असा आदेश राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला काल दिला.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य प्रधान अभियंत्यांनी कोसळलेल्या कामाची चौकशी करून प्राथमिक अहवाल सादर करावा, असा आदेश मुख्य सचिव गोयल यांनी दिला आहे. तसेच, कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून स्पष्टीकरण मागवले असून, मंगळवारपर्यंत सादर करण्याची सूचना केली आहे. मुख्य सचिवांनी केलेल्या सूचनांना प्राधान्यक्रम देण्यात यावे, तसेच, 18 जुलै रोजी अनुपालन अहवाल सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

प्रधान मुख्य अभियंत्यांचे आयआयटी रुरकीला पत्र
पणजी (प्रतिनिधी) : मुख्य सचिवांच्या आदेशानंतर साबांखाच्या प्रधान मुख्य अभियंत्यांनी उत्तराखंडमधील आयआयटी रुरकीला पत्र पाठवून या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याची, तसेच या प्रकारामागील नेमके कारण शोधून काढावे, अशी विनंती केली आहे. तसेच कंत्राटदार ‘टेकटॉन’ कंपनीकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, कला अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या आयआयटी मुंबईकडूनही स्वतंत्र अहवाल मिळवून तो सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

प्रधान मुख्य अभियंत्यांचे आयआयटी रुरकीला पत्र
पणजी (प्रतिनिधी) : मुख्य सचिवांच्या आदेशानंतर साबांखाच्या प्रधान मुख्य अभियंत्यांनी उत्तराखंडमधील आयआयटी रुरकीला पत्र पाठवून या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याची, तसेच या प्रकारामागील नेमके कारण शोधून काढावे, अशी विनंती केली आहे. तसेच कंत्राटदार ‘टेकटॉन’ कंपनीकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, कला अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या आयआयटी मुंबईकडूनही स्वतंत्र अहवाल मिळवून तो सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

न्यायालयीन चौकशी करा : आलेमाव
हे प्रकरण गंभीर असून, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

‘ओव्हरस्मार्ट’ मंत्री जबाबदार : काँग्रेस
कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्याच्या घटनेला भाजप सरकारमधील ‘ओव्हरस्मार्ट’ मंत्री जबबदार असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीने काल केला. तसेच संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांच्या निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भ्रष्ट मंत्र्यांना हटवा : सरदेसाई
हा प्रकार म्हणजे सरकारच्या भ्रष्टाचाराचेच एक उदाहरण आहे. हा मुद्दा आपण सातत्याने लावून धरला होता; पण मुख्यमंत्र्यांनी कला-संस्कृती मंत्र्यांना क्लीन चीट दिल्यामुळे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आतातरी या भ्रष्ट मंत्र्यांना त्वरित हटवावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली.