10 ऑगस्टपर्यंत चालणार; 2300 प्रश्न विचारले जाणार
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (दि. 18) सुरू होत असून, ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मागील दोन-एक वर्षांतील हे सर्वात दीर्घकाळ चालणारे अधिवेशन ठरणार आहे. ह्या अधिवेशनासाठी राज्यातील 40 आमदारांनी तब्बल 2300 प्रश्न विचारले आहेत, त्यात तारांकित व अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे.
जवळपास महिनाभर चालणार असलेल्या गोवा विधानसभेच्या ह्या 5 व्या अधिवेशनाचे प्रत्यक्ष दिवस हे 18 एवढे असतील. 18 ते 21 जुलै, 24 ते 28 जुलै, 31 जुलै ते 4 ऑगस्ट आणि 4 ते 10 ऑगस्ट या दिवसांत अधिवेशन चालेल.
या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेल्या अधिवेशनात मार्च 2023 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय विविध लक्षवेधी सूचना, सरकारी विधेयके व खासगी ठराव देखील ह्या महिनाभराच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.
काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोवन्स या विरोधी पक्षांनी सरकारला महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून कात्रीत पकडण्यासाठी रणनीती तयार केली आहे.
पहिल्या 10 दिवसांत प्रमुख प्रश्न मांडणार : विजय सरदेसाई
पणजी (प्रतिनिधी) : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी तारांकित आणि अतारांकित मिळून 324 प्रश्न दाखल केले आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या 10 दिवसांत नागरिकांना भेडसावणारे प्रमुख प्रश्न आपण मांडणार आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.