विशाल गोलतकरच्या खुनात पोलिसाचाही हात

0
5

एकूण 6 जणांना अटक; एका अल्पवयीनाचा समावेश; 7 दिवस कोठडी

2 खून प्रकरणांमध्ये 2 पोलिसांचा समावेश
जुने गोवे पोलीस स्थानकाच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांत झालेल्या दोन खून प्रकरणांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. जयेश चोडणकर याच्या खून प्रकरणामध्येही आयआरबी पोलीस कर्मचारी प्रितेश हडकोणकर अटक करण्यात आली आहे. पोलीस खात्याने प्रितेश हडकोणकर याला निलंबित केले आहे, तर आता विशाल गोलतेकरच्या खून प्रकरणात पोलीस शिपाई अमेय वळवईकरला अटक केली आहे.

मेरशी येथील सराईत गुन्हेगार विशाल गोलतकर याच्या खून प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून, त्यात नव्याने पोलीस खात्यात भरती झालेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचाही समावेश आहे. अमेय वळवईकर (25) असे वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

या खून प्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यात पोलिसाबरोबरच एका अल्पवयीनाचा समावेश आहे. अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित गुंड ‘कोब्रा’ ऊर्फ साई कुंडईकर (30), ओंकार च्यारी (19), गौरेश गावस (25), तुषार कुंडईकर (38) याचा समावेश आहे. या खून प्रकरणातील 5 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलाची अपना घरामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

मेरशी येथील सराईत गुन्हेगार विशाल गोलतकर याचा रविवारी दुपारी रस्त्याच्या बाजूला मृतदेह आढळून आला होता. शनिवारी रात्री त्याचा खून करून मृतदेह वयलेभाट-मेरशी येथील झाडाझुडपांत टाकून देण्यात आला होता. त्या ठिकाणी विशालची दुचाकी आढळून आल्यानंतर काहींनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. जुने गोवे आणि पणजी पोलिसांना या खून प्रकरणाचा छडा केवळ 6 तासांत लावण्यात यश आले होते. रविवारी रात्री जुने गोवे पोलिसांनी विशालच्या खून प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते, तर या प्रकरणातील आणखी एका संशयिताला सोमवारी ताब्यात घेण्यात आले. पोलीस शिपाई अमेय वळवईकर याचाही या खून प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात आढळून आले.