2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक कालपासून बंगळुरूमध्ये सुरू झाली. त्यात 26 पक्ष सहभागी झाले असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितले. मंगळवारी विरोधकांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजपनेही मंगळवार दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली आहे. या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा यांनी सांगितले. पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या वेळी विरोधी गट आणखी मजबूत करण्यासाठी आणखी 8 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्या सर्व पक्षांची यादी विरोधकांकडून जाहीर करण्यात आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती आणि किमान समान कार्यक्रमावर यावेळी चर्चा होईल. जे. पी. नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार असल्याचा दावा केलेला असला, तरी सर्व पक्षांची नावे मात्र त्यांनी जाहीर केली नाहीत.