इफ्फी : पॅनोरमा विभागात चित्रपटांसाठी प्रवेशिका खुल्या

0
4

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चे आयोजन करणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नोडल एजन्सी असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या 54 व्या चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या फीचर आणि नॉन फीचर अशा दोन्ही भारतीय चित्रपटांसाठी प्रवेशिका खुल्या केल्या आहेत.

इंडियन पॅनोरमा विभाग हा इफ्फीचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात भारतीय भाषांमधील चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रख्यात ज्यूरीद्वारे चित्रपट निवडले जातात. इफ्फी तसेच भारत आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय चित्रपट सप्ताहात आणि सांस्कृतिक देवाणघेवाण नियमावली व्यतिरिक्त विशेष भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवात हे चित्रपट प्रदर्शित केले जातात. नामांकित ज्युरी पॅनल त्यांच्या कौशल्याचा वापर करून, फीचर फिल्म विभागासाठी 12 सदस्य आणि बिगर फिचर फिल्म विभागासाठी 6 सदस्य सर्व सहमतीमध्ये सारखेच योगदान देतात ज्यामुळे संबंधित श्रेणीतील भारतीय पॅनोरमा चित्रपटांची निवड होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फीचर विभागातील जास्तीत जास्त 26 आणि नॉन फीचर विभागात 21 चित्रपट निवडले जाणार आहेत. या निवड प्रक्रियेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 च्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्मचा समावेश असेल. वास्तववादी, आशयघन आणि अभिरुचीपूर्ण म्हणून ओळखले जाणारे चित्रपट, भारतीय पॅनोरमाच्या अटी आणि प्रक्रियेनुसार निवडले जातात.

चित्रपटांसाठी पात्रता निकष
चित्रपटांसाठी पात्रता निकषांचा तपशील आणि प्रवेशिका दाखल करण्याची प्रक्रिया इफ्फीच्या संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध आहे. चित्रपट निवडण्यासाठी दोन मूलभूत पात्रता निकष आहेत. सर्व चित्रपटांमध्ये इंग्रजी सबटायटल्सचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपट 30 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 दरम्यान पूर्ण केलेले असावेत किंवा या कालावधीत सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र प्राप्त असावे. चित्रपट सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट आहे.