- ज. अ. रेडकर
‘लव्ह जिहाद’ हा प्रकार असो अथवा विविध व्यसनांकडे वळलेला तरुण असो, याला कारण संतसाहित्याकडे दुर्लक्ष हे होय. क्रमिक पुस्तकांतून संतसाहित्याला नगण्य स्थान दिले गेले, यामुळे त्या साहित्याची गोडी नवीन पिढीला लागली नाही. आधुनिक शिक्षणाने बौद्धिक विकास झाला खरा, परंतु सांस्कृतिक विकास खुंटला.
‘ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, असंगाशी संग करू नये।’ असे संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगून गेलेत. संत नेहमीच रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडीतून जे अनुभव येतात त्यातून बोध घेऊन समाजाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. संतसाहित्य हा आपल्या देशाचा फार मोठा ठेवा आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, सोयरोबा आंबिये, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या अशा कित्येक सत्पुरुषांनी भारतवर्षात भक्तीचा मळा फुलवला. अज्ञानाच्या अंधारात चाचपडणारा समाज या संतांच्या अभंगाने, कीर्तनाने व भजनाने समृद्ध झाला. घराघरांतून परमेश्वराची भजने गायचा प्रघात सुरू झाला. मंदिरांतून आरत्या-भजनाचे साप्ताहिक सोहळे होऊ लागले. एक मंगलमय वातावरण निर्माण झाले. सुसंस्कार यातून घडत गेले. ‘परोपकारः पुण्याय, पापाय परपिडनम्’ हा विचार सामान्य माणसाच्या मनात रुजला. मात्र तरुण पिढीकडे या ज्ञानाचा वसा पोहोचविण्यात माझी पिढी कमी पडली. याचा परिणाम असा झाला की, नवीन पिढी मूळ संस्कारांपासून दुरावली गेली.
‘लव्ह जिहाद’ हा प्रकार असो अथवा विविध व्यसनांकडे वळलेला तरुण असो, याला कारण संतसाहित्याकडे दुर्लक्ष हे होय. क्रमिक पुस्तकांतून संतसाहित्याला नगण्य स्थान दिले गेले, यामुळे त्या साहित्याची गोडी नवीन पिढीला लागली नाही. आधुनिक शिक्षणाने बौद्धिक विकास झाला खरा, परंतु सांस्कृतिक विकास खुंटला. शाळा-कॉलेज, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी होत असलेल्या साहचर्याने युवक-युवतीमध्ये प्रेमसंबंध जुळतात, भावनेच्या भरात ती एकमेकावर विश्वास ठेवतात आणि नंतर पश्चात्ताप करण्याची पाळी त्यांच्यावर येते. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. त्याचे होणारे परिणाम दिसत असूनदेखील माणसे सजग होत नाहीत हे दुर्दैवच म्हणायला हवे.
रोहित असाच एक तरुण कुसंगतीत सापडला आणि त्याच्या आयुष्याचे मातेरे झाले. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या रोहितला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रवेश मिळाला होता. घरापासून कॉलेज दूर असले की बऱ्याच मुलांना कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहावे लागते. रोहित राहत असलेल्या गावापासून कॉलेज तीस-चाळीस किलोमीटर दूर होते. रोज एवढा प्रवास जाऊन-येऊन करणे खर्चिक आणि त्रासदायक होते म्हणून त्याच्या वडिलांनी त्याची हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय केली.
आजपर्यंत रोहितवर घराबाहेर राहण्याचा प्रसंग कधीच आला नव्हता. वडीलधाऱ्यांच्या धाकात त्याचे आजवरचे आयुष्य गेले होते. हॉस्टेलमध्ये आता स्वतंत्र जीवन जगता येणार होते. ना कुणाची आडकाठी, ना कुणाचे भय! बऱ्याच मुलांना वडीलधाऱ्यांचा धाक म्हणजे शिक्षा वाटत असते. परंतु हा धाक आपल्या भल्यासाठी असतो याचा विचारच ही मुले करीत नाहीत आणि घरात दटावणाऱ्या मोठ्या माणसांचा त्यांना राग येत असतो. हॉस्टेलमध्ये राहायला लागल्यावर या मुलांना अगदी मोकळे मोकळे वाटते. तशातच नवीन मित्र भेटतात. त्यांचा एक ग्रुप तयार होतो. हाच ग्रुप पुढे हुल्लडबाजी करण्यात अग्रेसर राहतो. धूम्रपान करणे, बियर पिणे, वर्गाला दांडी मारून इतरत्र मौजमस्ती करणे याकडे कल वाढू लागतो. अर्थात याचा वाईट परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि शरीरप्रकृतीवर होतो.
आतापर्यंत शिस्तीत आणि धाकात वाढलेल्या रोहितचे देखील असेच झाले. मित्रांच्या संगतीने तो विविध व्यसनांत गुरफटला. त्याला ड्रग्जचे व्यसन जडले. नेहमी साप्ताहिक सुट्टीत घरी येणारा रोहित महिन्यातून एकदाच घरी येऊ लागला. तोदेखील वडिलांकडून मासिक खर्चासाठी लागणाऱ्या पैशाच्या मागणीसाठी. दिवसेंदिवस त्याची मागणी वाढत होती. मुलगा खूप शिकावा, चांगला अभियंता होऊन त्याचे भवितव्य सुरक्षित व्हावे म्हणून वडील घरात काटकसर करून मुलाची मागणी पूर्ण करायचे. मुलगा मोठा इंजिनिअर झाला की आपल्या कुटुंबाला सोन्याचे दिवस पाहायला मिळतील अशी त्यांना आशा होती, अपेक्षा होती. परंतु इकडे रोहित काय गुण उधळतो याची किंचितही कल्पना वडिलांना नव्हती. परीक्षांचे निकालही तो वडिलांना कळू देत नव्हता. दर परीक्षेत त्याचे एकदोन विषय मागे राहायचे. व्यसनामुळे त्याची प्रकृती खंगली. तरतरीत, गोरागोमटा चेहरा सुकून गेला. डोळे खोल गेले, डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागली. घरातील माणसांना वाटायचे त्याचे जेवणाखाणाचे हाल होतात म्हणून त्याची प्रकृती खालावली असेल किंवा अभ्यासासाठी जागरणे करीत असल्याने त्याचे डोळे खोल गेले असतील, चेहरा सुकला असेल. पण तसे नव्हते याचा पत्ता घरच्या मंडळीला फार उशिरा समजला- जेव्हा त्याच्या कॉलेजने रोहित बेहोष होऊन पडला आणि त्याला इस्पितळात दाखल केल्याचे कळवले तेव्हा!
कॉलेजमधून निरोप आल्यावर रोहितचे आई-वडील धावपळ करीत इस्पितळात पोहोचले. एका बेडवर रोहित बेहोष पडला होता. नाकातोंडात नळ्या खुपसलेल्या होत्या. डॉक्टरांपाशी चौकशी केल्यावर कळले की रोहितने ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्याने त्याची ही अवस्था झाली आहे. हे ऐकून रोहितचे वडील मटकन खालीच बसले. आपला गुणी मुलगा व्यसनात बुडाला यावर त्यांचा विश्वासच बसेना. आजवर आज्ञाधारक असणारा, नेहमी अभ्यासाव्यतिरिक्त कोणताच विचार न करणारा आपला मुलगा असा वाया गेला याचे त्यांना अपार दुःख झाले. किती आशा-अपेक्षा ठेवून त्याला इंजिनिअर करण्याचे स्वप्न आपण पाहिले होते. आर्थिक ओढाताण असतानाही त्याला तो मागेल तेवढे पैसे आपण देत होतो आणि हा इकडे त्या माझ्या कष्टाच्या पैशांची अशी उधळण करीत होता या गोष्टीचा पश्चात्ताप त्यांना आता होत होता. रोहितची ती अवस्था बघून त्याची आई धाय मोकलून रडत होती. आपला एकुलता एक मुलगा असा बेहोष पडलेला पाहिल्यावर कोणत्या मातेचे हृदय फाटणार नाही?
रोहितच्या वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. कालांतराने रोहितला इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला. रोहित आता व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे. पुढचे त्याचे आयुष्य म्हणजे भंगलेल्या हिऱ्यासारखे असेल.